टॉवर कोसळले, पत्रे उडाले
हिंगोली शहरात आणि परिसरात रविवारी दुपारी तीनच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठे नुकसान झाले. शहरातील अनेक भागांतील घरावरील पत्रे उडून गेले. बीएसएनएल व रिलायन्सचे टॉवर पडले. देवडानगर, जुने ग्रामीण पोलीस स्टेशन, जुनी जिल्हा परिषद, रस्त्यावरील झाडे पडून रस्ते बंद झाले. तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. बाजार समितीच्या मार्केट यार्डातील पत्रे व गायत्री शक्तिपीठावरील पत्रे उडून गेल्याने १० लाख रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
रविवारी दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. वाऱ्याचा वेग एवढा होता, की शहरातील बीएसएनएल कार्यालयावरील टॉवर कोसळले. त्याची पाहणी परभणी कार्यालयातील पथकाने केली. मंगळवारी दत्त मंदिरानजीक येहळेगावकर यांच्या इमारतीवरील रिलायन्सचे टॉवर पडल्याने कैलास बांगर व एकनाथ इंगळे यांच्या घराला तडे गेले. तर बाजार समितीच्या हळद मार्केट यार्डात १०० बाय ३००चा शेड होती. ती वादळी वाऱ्याने ४० फुटांच्या वर उडून बाजूला पडल्याने मोठे नुकसान झाले.
झाडाच्या फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयासमोर मुख्य रस्त्यावर असलेल्या अतिक्रमित चार ते पाच हॉटेल्सवरील पत्रे उडून गेल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. तसेच जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षण िभत पडली.
दरम्यान, शनिवारी उशिरा झालेल्या पावसामुळेही मोठे नुकसान झाले. वीज पडून सेनगाव तालुक्यातील बटवाडी येथील १४ वर्षांच्या अनिता लक्ष्मण झाडे या मुलीचा मृत्यू झाला. तर अन्य चार जण ठिकाणी जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रा खु. गावात अनेकांच्या घरांवरचे पत्रे उडाले. शनिवारी सायंकाळी ७ नंतर वादळी वारे, ढगाच्या गटगडाटासह पावसाला सुरुवात झाली होती. तालुक्यातील बटवाडी येथे लक्ष्मण अर्जुना झाडे (वय ३७), वर्षां भिकाजी झाडे (वय १५), अनिता लक्ष्मण झाडे (वय १४) हे गावाजवळच्या शेतात होते. पाऊस सुरू झाल्यामुळे हे तिघे एका झाडाखाली थांबले. दरम्यान झाडावर वीज कोसळल्याने अनिता झाडे जागीच ठार झाली. लक्ष्मण व वर्षां झाडे गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. याचप्रमाणे तालुक्यातील खांबा सिंनगी परिसरात शेतात वंदना विलास अंभोरे व त्यांची मुलगी वैशाली हे शेतात काम करीत होते. दरम्यान, जवळच्या एका झाडावर वीज पडली. यात वंदना व त्यांची मुलगी वैशाली जखमी झाल्याने त्यांना रिसोड येथील रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले आहे. जवळा, सवना येथेही जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी पत्रे उडाल्याचे वृत्त आहे.
वसमत तालुक्यातील गिरगाव, औंढा तालुक्यातील गोजेगाव परिसरात पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाल्याने िहगोली शहरासह ठिकठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

लातूरला दुसऱ्या दिवशी पावसाने झोडपले
लातूर : सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह लातूरकरांना पावसाने झोडपले असून, काही भागांत शेतातून पाणी वाहात असल्याचे चित्र दिसले.शुक्रवारी संध्याकाळी जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस झाला. पुन्हा शनिवारी झालेल्या पावसाने उन्हाच्या काहिलीतून नागरिकांची सुटका केली. रविवार, दिनांक ५ जून रोजी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत पडलेला तालुकानिहाय पाऊस (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये)निलंगा-१७, अहमदपुरात-१६, जळकोट-१५, चाकूर-१०, देवणी-१०.६६, औसा ०८.५७, शिरूर अनंतपाळ-४, रेणापूर-४, उदगीर-३ पाऊस झाला. जिल्ह्यातील सरासरी ९.८ मि.मी. एवढी नोंद झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला असला तरी सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे घरांवरील पत्रे उडून जाणे, वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.