13 August 2020

News Flash

लातूरमध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे २०८ कोटींचे अनुदान रखडले

सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग, उडीद अशा पिकांचे मोठे नुकसान झाले होते.

प्रातिनिधीक छायाचित्र

गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर व ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात जिल्हय़ात अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले. उभी पिके पाण्यात राहिली. नदीपात्रात लगतच्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली होती. ही घोषणा होऊन १० महिने उलटले तरी शेतकऱ्यांना एक छदामही मिळालेला नाही.

जिल्हय़ातील ३ लाख ९ हजार ७४४ हेक्टर क्षेत्राला अतिवृष्टीचा फटका बसल्याचा पंचनामा करून महसूल विभागाने २०८ कोटी ४२ लाख १७ हजार २६४ रुपयांची मागणी सरकारकडे केली होती. लातूर तालुक्यातील ८० हजार ३३६ हेक्टरचे नुकसान झाले. त्यापोटी ४५ कोटी ३७ लाख ९६ हजार २००, रेणापूर ४० हजार २५५ हेक्टरसाठी २७ कोटी ३७ लाख ३४ हजार, निलंगा तालुका ८७ हजार ८८५ हेक्टरसाठी ५९ कोटी ७६ लाख १८ हजार, औसा तालुका ५६ कोटी २४ लाख ३९ हजार ७६४, देवणी तालुका १९ कोटी ६६ लाख, २८,८०० अशी तपशीलवार मागणी गावनिहाय पंचनामे करून महसूल विभागाकडे पाठवली होती.

सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग, उडीद अशा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तेरणा, मांजरा, मन्याड अशा नद्या दुथडय़ा भरून वाहिल्या. नदीकाठाच्या लगतची जमीन मोठय़ा प्रमाणात वाहून गेली, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने रेणापूर, औसा, लातूर या तालुक्यांत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक गावांचे रस्ते वाहून गेले. पुले वाहून गेली. सिमेंट बंधाऱ्यांचे नुकसान झाले. लातूर ग्रामीणचे आ. त्र्यंबक भिसे यांनी विधानसभेत यासंबंधी आवाज उठवला. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र हाती काही लागले नाही.

तत्कालीन पालकमंत्री पंकजा मुंडे व नवे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडेही पाठपुरावा केला. बोकनगाव-सलगरा-बदगीहाळ या रस्त्यावरील पूल वाहून गेला. औसा-भादा-भेटा या मार्गावरील पूल वाहून गेला. जवळपास १६ रस्ते वाहून गेले. सर्व ठिकाणी तात्पुरती दुरुस्ती करून वाहतूक सुरू करण्यात आली. वर्ष होत आले तरी यासाठी निधी दिला गेला नाही. या रस्ते व पुलासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे, मात्र शासकीय स्तरावर केवळ टोलवाटोलवी सुरू आहे.

औरंगाबाद येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बठकीत अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासन तातडीने मदत करेल, त्यासाठी पंचनामे करण्याची अट राहणार नाही. ज्यांनी पीकविमा भरला आहे त्यांना पीकविम्यामार्फत मदत केली जाईल, मात्र ज्यांनी पीकविमा भरलेला नाही अशा शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही. मिळणाऱ्या पीकविम्याच्या रकमेच्या ५० टक्के रक्कम राज्य शासनाकडून दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी त्या वेळी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग दिला नाही व ज्यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी महसूल विभागामार्फत पाठवण्यात आली, मात्र ती यादीही अद्याप बासनात गुंडाळून ठेवण्यात आली आहे.

एखादे लहान मूल रडायला लागल्यानंतर त्याचे रडणे तात्पुरते बंद व्हावे यासाठी त्याच्या तोंडात चॉकलेट कोंबले जाते. त्यातून ते रडण्याचे मूळ कारण विसरते. अगदी त्याचप्रमाणे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे न करता सरसकट मदत केली जाईल, अशी घोषणा केल्यामुळे त्या वेळी शेतकरी सुखावले. मात्र पीकविम्याची रक्कम ज्यांनी पीकविमा भरला होता त्या शेतकऱ्यांना मिळाली. त्यातही काही जणांच्या तक्रारी आहेत, मात्र ज्यांनी पीकविमा भरला नाही असा शेतकरी अडचणीत सापडला आहे. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असे सरकारच्या वतीने वारंवार सांगितले जाते. शेतकरीहिताच्या घोषणा केल्या जातात, मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्यामुळे सरकारच्या हेतूबद्दलच शेतकऱ्यांच्या मनात शंका निर्माण होत आहेत.

सध्याच्या विरोधी पक्षातील मंडळींना विरोधाचा अनुभव नाही, त्यामुळे ते चाचपडत आहेत अन् विरोध करणारी मंडळी सत्तेत असल्यामुळे विरोधकांना कसे गुंडाळून ठेवायचे याच्या अटकळी त्यांना जमत आहेत. त्यामुळे सरकारचा कारभार सुरळीत चालू असल्याचा भास होतो आहे. शेतकऱ्यांची फसवणूक सरकारला फार काळ परवडणारी नाही. प्रामाणिक, पारदर्शी सरकार असल्याची प्रचीती शेतकऱ्यांना आली तरच शेतकरी गप्प बसेल, अन्यथा त्याचा उद्रेक अधिक मोठा होण्याची शक्यता आहे.

मदत नाहीच

सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग, उडीद अशा पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तेरणा, मांजरा, मन्याड अशा नद्या दुथडय़ा भरून वाहिल्या.  त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या पावसाने रेणापूर, औसा, लातूर या तालुक्यांत अक्षरश: धुमाकूळ घातला होता. अनेक गावांचे रस्ते वाहून गेले.सिमेंट बंधाऱ्यांचे नुकसान झाले. लातूर ग्रामीणचे आ. त्र्यंबक भिसे यांनी विधानसभेत यासंबंधी आवाज उठवला. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, राज्याचे प्रधान सचिव यांच्याकडे पाठपुरावा केला, मात्र हाती काही लागले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 26, 2017 1:22 am

Web Title: heavy rain in latur 2
Next Stories
1 …म्हणून पैठणमध्ये महिलांनी फोडली ‘मडकी’
2 पैठण पोलिसात मुख्यमंत्र्यांविरोधात फसवणुकीची तक्रार
3 VIDEO: शेतकरी भावंडांची ‘डोक्यालिटी’; राजदूतवरून सोयाबीन फवारणी
Just Now!
X