मराठवाडय़ात पूर्वमोसमी पावसाने शनिवारी रात्रीपासून दाणादाण उडवून दिली असून, विदर्भातही अनेक भागात वादळी पावसाने हजेरी लावली. अनेक भागात घरांचे छप्पर उडून गेले, तर वीज पडून चौघांचा बळी गेला. पुणे, नगर, सांगली जिल्ह्य़ातही विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला.
हिंगोली जिल्हय़ात शनिवारी वीज पडून एकाचा मृत्यू झाला, तर चौघे जखमी झाले. बीड जिल्हय़ातही एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. उस्मानाबाद व लातूर जिल्हय़ातही वादळी पावसामुळे घरावरचे पत्रे उडून गेले. विदर्भातील बहुतांशी शहरे आणि जिल्ह्य़ांमध्ये सायंकाळी वादळी पाऊस झाला. गडचिरोली जिल्ह्य़ात साखरपुडय़ाचा सोहळा सुरू असताना वीज पडल्याने २३ जण जखमी झाले. नगर जिल्हय़ात पूर्व मोसमी पावसाने वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. वीज कोसळून व घरांची पडझड झाल्याने दोघांचा मृत्यू झाला.