उस्मानाबाद जिल्ह्यातील उस्मानाबादसह तुळजापूर कळंब, लोहारा, वाशी आणि उमरगा तालुक्यात मागील दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेकांची घरे व पॉलिहाऊस जमीनदोस्त झाली आहेत. दोन दिवसांत जिल्ह्यात ३४.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक पाऊस तुळजापूर, उमरगा व उस्मानाबाद तालुक्यांत तर सर्वात कमी पावसाची नोंद परांडा तालुक्यात झाली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील उस्मानाबाद शहरासह पाडोळी, केशेगाव महसूल मंडळात शनिवारी सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. वादळी वारे, विजांचा कडकडाट यामुळे नागरिक भयभीत होत होते. तालुक्यातील खानापूर, सारोळा, पाडोळी परिसरात पॉलिहाऊस वादळी वाऱ्यात जमीनदोस्त झाले. खानापूर शिवारातील हातलादेवी परिसरात पावसाने थमान घातले होते. यामध्ये अमित मोदाणी व संजय मोदाणी यांच्या शेतातील तीन एकर शेडनेट व एक एकर १० गुंठे क्षेत्रावर उभारलेले पॉलिहाऊस जमीनदोस्त झाले. या पॉलिहाऊसमध्ये मोदाणी यांनी ढोबळी मिरची, रिजावन काकडी व डच गुलाब ही पिके घेतली होती. पॉलिहाऊस व शेडनेट हे फाऊंडेशनसह जमीनदोस्त झाल्याने मोदाणी यांचे जवळपास ८० लाखांचे नुकसान झाले आहे. फाऊंडेशनचे पाइप जागेवर तुटून पडले आहेत. तसेच बार्शी रोडलगतचे विद्युत पोल वादळाच्या तडाख्यात जमीनदोस्त झाले आहेत. या भागातील विद्युतपुरवठा दोन दिवसांपासून बंद आहे. वैराग रोडलगत असलेल्या पोल्ट्री फार्मवरील पत्रे पूर्णपणे उडून गेले. यातील लहान कोंबडय़ांच्या अंगावर भिंत व पत्रे पडल्याने संपूर्ण कोंबडय़ा मृत्युमुखी पडल्या आहेत. शनिवारी सायंकाळी येरमाळा परिसरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात येरमाळा येथील पत्र्याच्या शेडची घरे, हॉटेल, टपऱ्यांचे व झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासातील पहिल्यांदाच जोराच्या वादळी वाऱ्याचा अनुभव येरमाळय़ासह परिसरातील लोकांना आला. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत जिल्ह्यात एकूण ३४.६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस तुळजापूर व उमरगा तालुक्यांत झाला आहे. तुळजापूर तालुक्यात ४८.१ मिलिमीटर, उमरगा ४३.४, उस्मानाबाद ४२.१, लोहारा ३३.७, वाशी ३२.७, कळंब ३२, परंडा १५ तर भूम तालुक्यात २०.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.