औरंगाबादमध्ये भिंत पडून मुलाचा मृत्यू; अनेक ठिकाणी झाडे, घरांची पडझड

औरंगाबाद : वळवाच्या पावसाने शुक्रवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा त्याचप्रमाणे विदर्भामध्ये काही ठिकाणी जोरदार तडाखा दिला.

मराठवाडय़ातील नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद आणि बीड या चार जिल्ह्य़ांत मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक ठिकाणी झाडे आणि घरांची पडझड झाली. पत्रे उडून काही ठिकाणी नागरिक जखमी झाले. भोकर तालुक्यातील धारजनी येथे एका अकरा वर्षांच्या मुलाचा भिंत पडून मृत्यू झाला. दरम्यान, पुढील चार दिवस  राज्यात अनेक ठिकाणी वळवाचे थैमान सुरू राहणार असल्याचा अंदाज आहे.

पर्जन्यभान

मोसमी पावसाची वाटचाल सध्या ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात तसेच मिझोरम, मणिपूरच्या काही भागात झाली आहे. अंदमाननंतर २९ मे रोजी केरळात दाखल झालेल्या मोसमी पावसाची वाटचाल पोषक वातावरणामुळे चांगली सुरू होती. मात्र,कर्नाटकपर्यंत पोहोचलेला मोसमी पाऊस काहीसा रेंगाळला आहे.