बीड जिल्हा प्रशासनाची खबरदारी

बिंदुसरा प्रकल्पाच्या दोन्ही सांडव्यातून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागल्याने नदीला पूर आला आहे. रविवारी सकाळी धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर बिंदुसरा नदीवरील पुलाला पाणी लागले. पूर्वीच हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाल्याने नवीन पूल बांधण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, काहीच झाले नाही. यामुळे महाडच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या पुलाची पाहणी करून पुलावरची जडवाहतूक बंद करून इतर मार्गाने वळवल्याने या मार्गावर वाहनांची मोठय़ा प्रमाणात कोंडी झाली आहे.

बीड शहरातून धुळे-सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. शहरालगत असलेल्या बिंदुसरा नदीवर मोठा पूल आहे. मात्र, अनेक वर्षांपासूनचा हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला असल्याचा निर्वाळा काही महिन्यांपूर्वीच प्राधिकरणाने देऊन नवीन पूल बांधण्याचा निर्णय जाहीर केला होता. मात्र, या मार्गाचे काम सुरू असले तरी बिंदुसरा नदीवरील पुलाच्या कामाला अद्याप सुरुवातच झाली नाही. दरम्यान तीन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला. डोकावाडा, करचुंडी, भायाळा हे साठवण तलाव भरून ओसंडून वाहू लागल्याने बिंदुसरा प्रकल्पात पाण्याची आवक मोठी झाली आणि अवघ्या सात तासात दहा वर्षांनंतर बिंदुसरा प्रकल्प भरला. शनिवारपासून प्रकल्पाच्या दोन्ही सांडव्यांवरून मोठय़ा प्रमाणात पाणी वाहू लागले आहे.

तर इतर ठिकाणाहून बिंदुसरा नदीत येणारे पाणी व धरणातील पाणी यामुळे नदी दुथडी भरून वाहू लागली. रविवारी सकाळी तर नदीचे पाणी पुलाच्या खालच्या बाजूला लागले. पुलाच्या भिंतींना पूर्वीच तडे गेले आहेत. आणि राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे वाहतूक प्रचंड आहे. जड वाहनांच्या तर रांगाच असतात. त्यामुळे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी या पुलाची सकाळीच पाहणी करून या पुलावरून जडवाहनांची वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे औरंगाबादहून येणारी जड वाहने गढी येथून वळविण्यात आली आहेत. तर शिवाजी चौकातून चुंबळी फाटा माग्रे मांजरसुंब्याकडे व तेथून उस्मानाबादकडे पाठवली जात आहेत. तर उस्मानाबादहून येणारी वाहने केजकडे वळवण्यात आली आहेत व माजलगावमाग्रे औरंगाबादकडे सोडण्यात येत आहे. केवळ छोटी वाहने व परिवहन विभागाच्या बस सोडण्यात येत असून पुलावर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात आली आहे.