सोयाबीनचे मोठे नुकसान

दुष्काळाचा तडाखा सोसाव्या लागलेल्या मराठवाडय़ातील लातूर, हिंगोली जिल्ह्य़ात शनिवारी रात्री अतिवृष्टीचा तडाखा बसल्याने खरीप हंगामातील उरल्यासुरल्या पिकांचेही नुकसान झाले.

सततच्या पावसाने वैतागलेल्या लातूरकरांना शनिवारी रात्रीच्या पावसाने पुन्हा एकदा तडाखा दिला. चार दिवस पावसाने उघडीप दिल्यामुळे गावोगावी सोयाबीन काढणीची घाई सुरू होती. शहरातील मजुरांना गावात काम मिळत होते. इतिहासात पहिल्यांदाच हे घडले. पीकविमा मिळण्याची घोषणा झाली असली तरी पसे मिळेपर्यंत चिंता असतेच. शनिवारी सायंकाळपासून निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ या तालुक्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले. अनेक मंडळांत अतिवृष्टी झाली. साकोळ २०५, शिरूर अनंतपाळ १६५, निटूर १३४, वलांडी १४५, देवर्जन ११९, उजेड १०५, बोरोळ १०३, देवणी ९८,

रविवार दिनांक ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपर्यंत तालुकानिहाय पडलेल्या पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत.  लातूर १३.७५ (१००८.२५), औसा १९.४३ (९७९.०८), रेणापूर १२ (११६६), अहमदपूर १४.३३ (११०६.५८), चाकूर १३.८० (१२१४.५०), उदगीर ३३.५७ (१०९६.५५), जळकोट २२.५० (१०५२), निलंगा ५३.५० (११६५.१४), देवणी ११५.३३(१०७३.९६), शिरूर अनंतपाळ १५८.३३ (१२४५.५७), एकूण सरासरी ४५.६५ (१११०.८९). वार्षिक सरासरीच्या १३८.४९ टक्के इतका पाऊस झाला आहे.

हिंगोली- जिल्ह्य़ात शनिवारी सायंकाळी सर्वदूर मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नदी, नाले, ओढय़ाकाठी शेतात काढून ठेवलेले सोयाबीनचे पीक वाहून गेले. तर काही शेताला तलावाचे स्वरूप आल्याने पिकाचे मोठे नुकसान होऊन शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे.  गेल्या आठवडय़ात जिल्हाभर जोरदार पावसाचे आगमन झाले. अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांचे ४० टक्केच्या वर नुकसान झाले. शेतातील सोयाबीन काढणीला आली होती. ग्रामीण भागात सोयाबीन काढण्यासाठी मजुरांची अडचण असताना शनिवारी सायंकाळी ५च्या नंतर जिल्ह्य़ात मुसळधार पाऊस झाला. यामध्ये नदी, नाले, ओढय़ाच्या काठावरील शेतातील काढून ठेवलेले सोयाबीन  वाहून गेले. तर ठिकठिकाणी शेतीला शेततलावाचे स्वरूप आले. सुरुवातीला ४० टक्क्यांच्या वर तर आता ५० टक्क्यांच्या वर सोयाबीन पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्य़ात २ लाख २० हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन, ७० हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस, २५ हजार हेक्टर क्षेत्रावर तूर, तर इतरही खरीप पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली होती. मात्र, परतीच्या पावसाने संपूर्ण पिकाचे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी जिल्ह्य़ात झालेल्या मुसळधार पावसाची रविवारी सकाळी ९ वाजता घेतलेली नोंद मि.मी.मध्ये तर कंसात आतापर्यंत पडलेला पाऊस िहगोली ६१.१४ (९९३.१७), वसमत ४८.३९ (९८०.४०), कळमनुरी २७.६७(८९६.३१), औंढा नागनाथ ४०.०० (१०२६.७५) सेनगाव ९.१७ (७७४.६६) एकूण १८६.२७ (४६७१.२९) ज्याची टक्केवारी वार्षिक सरासरी १०४.९३ टक्के इतकी आहे.    जिल्ह्य़ात सर्वाधिक औंढा नागनाथ तालुक्यात एकूण १०२६.७५ इतकी पावसाची नोंद झाली. गतवर्षी या तारखेला ती ५३६.०० इतकी होती. तर सेनगाव तालुक्यात सर्वाधिक कमी पावसाची नोंद झाली. ती एकूण ७७४.६६ इतकी असून, गतवर्षी याच तारखेपर्यंत ६८०.१७ इतकी होती. शनिवारी िहगोली जिल्ह्य़ात सर्वाधिक पडलेल्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्य़ात तीन धरणांचा समावेश असून, त्याच्या पाणीपातळीत आता वाढ होऊ लागली आहे. येलदरी धरणात २५.८६ टक्के, सिद्धेश्वर धरणात ६९.८१ टक्के, तर ईसापूर धरणात ४७.०३ टक्के पाणी जमा झाले आहे.