सोयाबीन, संकरित ज्वारी आणि कापसालाही अतिवृष्टीचा फटका

आज दिवसभरात पावसाचा जोर ओसरला तरीही हलक्या सरी सुरूच होत्या. सायंकाळी पुन्हा पावसाने ताल धरला. जिल्ह्यातील सर्व जलसाठे तुडुंब भरले असून लोअर दुधना धरण ९२ टक्के भरले आहे. दरम्यान जिल्ह्यात पावसाने वार्षिक सरासरीच्या उंबरठय़ावर टप्पा गाठला आहे. या पावसाळ्यात आज सकाळपर्यंत ७४१.३८ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आज दिवसभर होणाऱ्या पावसाची आकडेवारी त्यात समाविष्ट झाली. जिल्ह्याची वार्षिक सरासरी पूर्ण होईल, असा अंदाज आहे.

गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. मात्र ,नदी व ओढय़ाकाठच्या कापूस व सोयाबीन पिकांची अवस्था चिंताजनक झाली आहे. त्याचबरोबर निचरा न होणाऱ्या जमिनीतील पिकांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. सोयाबीनच्या शेंगांमध्ये अक्षरश काही ठिकाणी मोड फुटले आहेत, तर जमिनीत पाणी साचल्याने कापसालाही त्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पाऊस अखंड चालू असताना सर्वत्र शेताशिवारात पाणीच पाणी झाले आहे. आज दिवसभर वातावरण ढगाळ होते. काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळल्या. संध्याकाळी मात्र संततधार पावसाला पुन्हा प्रारंभ झाला. जिल्ह्यातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या लोअर दुधनाचे २० पकी १९ दरवाजे उघडले आहेत. दरम्यान गोदाकाठच्या गावांना दोन दिवसांपूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

काल दिवसभर जोरदार पाऊस झाला. आज सकाळी संपलेल्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २०.६२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. या कालावधीत सोनपेठ तालुक्यात सर्वाधिक ३९.०० मि.मी. पाऊस झाला. जिल्हय़ात २५ सप्टेंबर रोजी झालेला तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून सर्व आकडेवारी मिलिमीटर परिमाणात आहे. कंसातील आकडेवारी चालू हंगामातील आजवरच्या एकूण सरासरी पावसाची आहे. परभणी ९.०० (६६७.२४), पूर्णा १८.८० (९९३.३०) गंगाखेड, २८.०० (६८६.५०) पालम, १८.०० (७२६.६७), सोनपेठ, ३९.०० ( ८२६.७५), सेलू १५.८० (७७४.०४), मानवत, २२.६७ (८०८.६९) पाथरी, २२.०० (६१३.९५), जिंतूर, १२.३३ (५७५.३१) पावसाची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील अनेक गावात आज वाहतूक बंद झालेली होती. पावसामुळे अंतर्गत रस्ते बंद पडल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. काल दिवसभर सेलू, पाथरी या रस्त्यावरची वाहतूक पूर्णपणे बंद होती. कसुरा नदीला पूर आल्याने संपर्कच तुटला होता.

माजलगाव, सेलू आदी ठिकाणची वाहतूक ठप्प होती. पाथरीहून सेलू व माजलगावकडे जाणारी सर्व वाहने खोळंबून राहिल्याने याचा मोठा त्रास सहन करावा लागला. जिल्ह्यातील अन्य नद्या व तलाव तुडुंब भरून वाहात आहेत.

गंगाखेडला वळसा घालून पुढे जाणाऱ्या गोदावरी नदीचा घाट गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच बुडाला आहे. आज दिवसभरात वाहतूक सुरळीत झाली असली तरीही शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान सध्याच्या पावसाने होत असल्याचे दिसत आहे.

संकरित ज्वारी व सोयाबीन या पिकांना अक्षरश शेतातच मोड फुटले आहेत. संकरित ज्वारीच्या कणसातून मोड फुटत आहे तर सोयाबीनच्या शेंगांनाही आतून मोड फुटले आहेत. आता पावसाने उघडीप जरी घेतली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.