प्रमुख प्रकल्पांमध्ये ६८.६१ टक्के जलसाठा

औरंगाबाद : मागील आठवडय़ासह ऐन दिवाळीतही मुक्कामी असलेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेले सोयाबीन, बाजरी, मका आदी पिकांचे नुकसान करून शेतकऱ्यांच्या आशा-आकांक्षांवर पाणी फेरले. ऐन दिवाळीतच नुकसानीचे तोंड शेतक ऱ्यांना पाहावे लागल्याने दिव्यांचा हा मोठा सणही शेतक ऱ्यांना साजरा करता आला नाही. एकीकडे अशी परिस्थिती तर दुसरीकडे प्रमुख प्रकल्पांमध्ये वाढलेल्या पाणीपातळीमुळे टंचाईपासून काहीशा प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

प्रमुख १३ मध्यम प्रकल्पांमध्ये ६८.६१ टक्के पाणीसाठा झाला आहे. जायकवाडीसह लोअर मनार डॅम, खडका वेअर हे तीन शंभर टक्के तर विष्णुपुरी प्रकल्पात ९४.२३ टक्के पाणीसाठा झाला आहे. येलदरी प्रकल्पात ५२.७८ टक्के, माजलगावमध्ये ६९.४६, इसापूर प्रकल्पात ५५.५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. सीना कोळेगावमध्ये ७८.८२, तर  लोअर तेरणामध्ये अवघा २९.७९ पाणीसाठा आहे. मांजरा, सिद्धेश्वर आणि लोअर दुधना या प्रकल्पांमध्ये अनुक्रमे ७.३४, ८.३० व ७.८९ टक्के पाणीसाठा आहे. शहागड  वेअरमध्ये शून्य टक्के पाणी साठा आहे. तेरा प्रकल्पांमध्ये एकूण ६८.६१ टक्के पाणीसाठा झाला असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याची चिंता काही अंशी मिटली आहे. साधारण मार्च-एप्रिलपर्यंत टँकरची गरज भासणार नाही, असे सांगितले जात असून गतवर्षी अवघा २९.५७ टक्के पाणीसाठा होता.

परतीच्या पावसाने प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झालेली असली तरी पिकांचे मात्र अतोनात नुकसान झालेले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या फटक्यात हिरावून घेतल्यामुळे शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. आडगाव येथील शेतकरी गणेश हाके यांनी सांगितले, की गावात २९०० एकरवर बाजरी, मका, तूर आणि कापूस हे पिके चांगली आलेली होती. आपल्या दोन एकरवरील बाजरीतून २५ ते ३० िक्व टल उत्पन्न अपेक्षित होते. तर काका विश्वंभर हाके यांच्या शेतातील तीन एकरवरील मक्याला आता कोंब फुटले आहेत. या पिकांच्या नुकसानीमुळे काहीही उत्पन्न मिळणार नाही. गावात शंभर एकरवर बाजरी, २०० एकरवर मका, ५०० एकरवर कापूस तर ३०० एकरवर तुरीचे नुकसान झाले आहे. गतवर्षही नुकसानीत गेले. यंदाही तशीच गत झाल्याचे हाके यांनी सांगितले.

आडगावसह चितेपिंपळगाव, पळशी, पिसेगाव, पोखरी, गोलटगाव आदी इतरही गावातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून सततच्या पावसामुळे रब्बीच्या पेरणीतही अडचणी निर्माण झाल्याचे शेतकरी अशोकराव लोखंडे यांनी सांगितले.