मका, कापूस, बाजरी भिजली

औरंगाबाद : औरंगाबाद शहर व परिसरात शनिवारी पुन्हा एकदा जोरदार पाऊस झाला. आडगाव परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कापूस, मका, बाजरी आदी काढणीला आलेली पिके भिजून गेली असून शेतकरी कोलमडून पडला आहे.

विजांच्या कडकडाटासह सुमारे तासभर पाऊस आडगाव, निपाणी, परदरी, गांधेली आदी भागात झाला. पावसाने काढणीला आलेले मक्याचे पीक अक्षरश भिजून गेले गेले. आधीच काळवंडलेली मक्याची कणसं पावसाने भिजली असून ती आता जनावरांना खायला टाकायच्या लायकीचेच राहिले आहे, असे आडगाव येथील शेतकरी अशोक लोखंडे यांनी सांगितले. वेचणी सुरू असलेला कापूसही सलग दोन दिवसांच्या पावसाने भिजला असून आता त्याचाही बाजारभाव घसरण्याच्या शक्यतेने शेतकरी वर्ग धास्तावला आहे.

बाजरी, सोयाबीन आदी पिकांचेही नुकसान झालेले आहे. बाजरीची सध्या सोंगणी सुरू असून कणसं भिजून माल काळवंडून कवडीमोल भाव मिळण्याची भीती शेतक ऱ्यांमध्ये पसरली आहे. मागील तीन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. कापूस पूर्णपणे भिजला आहे. बाजारात सध्या भिजलेल्या कापसाला तीन हजारांपेक्षा अधिकचा दर मिळत नसून शेतकरी कोलमडून पडला आहे, असे शेतकरी अशोक लोखंडे यांनी सांगितले.

शहरातही सरी

औरंगाबाद शहरात शनिवारी दुपारी पुन्हा जोरदार पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहिल्या. मेघगर्जनेसह पडणाऱ्या पावसामुळे औरंगाबादकर पुरते वैतागले आहेत. शुक्रवारी झालेल्या दीड तासाच्या पावसाने औषधी भवन भागातील दुचाकी वाहने नाल्याच्या पाण्यात वाहून गेली. अनेकांच्या घरात पाणी शिरले. ते काढून होण्यापूर्वी शनिवारी दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. सरीवर सर असा खेळ दिवसभर सुरू होता. सप्टेंबर अखेरीस वार्षिक सरासरीच्या १२५ टक्के पाऊस झाला.

ऑक्टोबर महिन्यातील उष्णता पुरेशी जाणवण्यापूर्वीच पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. हाती राहिलेले पीकही या पावसामुळे संकटात आले आहे. सकाळी काही वेळी ऊन पडल्यानंतर आभाळ भरून आले आणि पावसाला सुरुवात झाली. शुक्रवारच्या पावसामुळे शहरातील मिटमिटा, पडेगाव, भीमनगर, भावसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, जयसिंगपुरा, लेबर कॉलनी, सिल्कमिल कॉलनी, ज्युबली पार्वष्ठ, नंदनवन कॉलनी, संभाजी पेठ, समर्थनगर, गरमपाणी, खडकेश्वर, गुलमंडी, सिटी चौक, शहागंज, जाफरगेट, जुना मोढा, निराला बाजार, दलालवाडी, पैठणगेट येथील सखल भागात पाणी साठले होते. शनिवारचा दिवस पावसाचाच होता.

हिंगोलीत पुन्हा पाऊस

हिंगोली: जिल्ह्यात सततच्या अतिवृष्टीमुळे आधीच शेतकरी मेटाकुटीला आला आहे. चार-पाच दिवसांच्या विश्रांतीने सोयाबीन काढणीची लगबग सुरू असतानाच पुन्हा पाऊस आल्याने शेतकऱ्यांची दमछाक झाली. शुक्रवारी मेघगर्जनेसह पाऊस झाल्याने शेतकऱ्याची चांगलीच दमछाक झाली.

जिल्ह्यात या वर्षी सर्वत्र अतिवृष्टी झाली. ओढे-नाले-नद्यांना आलेल्या पुराच्या पाण्यामुळे नदीकाठची पिके जमिनीसह खरडून वाहून गेली. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांनी पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये मदत करण्याची मागणी केली. पंचनाम्याचे काम सुरू आहे. १.४७ लाख हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुमारे ६० हजार हेक्टर क्षेत्रावरील पीक नुकसानीचे पंचनामे झाले आहेत.  दोन दिवसांपूर्वी सलग चार-पाच दिवस पावसाने  विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीस सुरुवात केली आहे.  विशेष म्हणजे एकरी उत्पादनात घट झाली असून त्यातच मजुरीचे दर वाढल्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.