News Flash

औरंगाबाद, हिंगोलीत जोरदार पाऊस ; अन्य जिल्ह्य़ांत हलक्या सरी

औरंगाबादेत सकाळपासूनच जोरदार वारे वाहू लागले होते. ढगाळ वातावरणही होते.

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद : दक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तोत्के चक्रीवादळासारख्या वातावरणाचा परिणाम मराठवाडय़ातही दिसून आला. मराठवाडय़ात दोन दिवसांपासून जोरदार वारे वाहू लागले आहे. शनिवारी रात्री लातूर जिल्ह्य़ात तास ते दीड तास तर रविवारी औरंगाबाद, हिंगोलीसह मराठवाडय़ाच्या काही भागात जोरदार व हलका पाऊस झाला.

औरंगाबादेत सकाळपासूनच जोरदार वारे वाहू लागले होते. ढगाळ वातावरणही होते. सायंकाळी साडेचारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. तत्पूर्वी २ च्या सुमारास हलका शिडकावा येऊन गेला होता. साडेचारच्या सुमारास दाटून आलेल्या ढगांमुळे अंधार पडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. सुमारे तासभर वादळवाऱ्यासह पाऊस झाला. जिल्ह्य़ातील इतर भागातही पाऊस झाल्याचे वृत्त आहे. विहामांडवा परिसरातही तासभर चांगला पाऊस झाल्याचे शेतकरी मनोज गाजरे यांनी सांगितले. तर पावसामुळे शेतीचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचे फळ उत्पादक संजय तवार यांनी सांगितले.

जालन्यातही रविवारी जोरदार वारे वाहिले. जालना जिल्ह्य़ातील अंबड, बदनापूरसह अन्य तालुक्यातही पाऊस झाला. हिंगोलीतही दुपारच्या सुमारास तासभर जोरदार पाऊस झाला. परभणीत दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर हलक्या सरी बरसल्या. लातूर जिल्ह्य़ात शनिवारी रात्री दहानंतर तास-दीड तास विविध भागात पाऊस झाला. बीड, उस्मानाबाद जिल्ह्य़ात पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. नांदेडमध्येही ढगाळ वातावरण होते. दुपारी हलक्या सरी बरसल्या. सध्या शेतीत मशागतीच्या कामांना वेग आलेला आहे. पावसाळी वातावरणामुळे मशागतीच्या कामांना थांबवण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 12:01 am

Web Title: heavy rains in aurangabad hingoli zws 70
Next Stories
1 करोनावरील बदलत्या उपचारपद्धतीने औषधनिर्माण कंपन्यांसमोर आव्हान
2 मराठवाडय़ासाठी २०५ टन प्राणवायू पुरवठय़ाचे आदेश
3 वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी कोविडच्या नव्या अभ्यासक्रमाचा प्रस्ताव
Just Now!
X