29 October 2020

News Flash

मराठवाडय़ात पावसाचा जोर

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू; २० महसूल मंडळात अतिवृष्टी

संग्रहित छायाचित्र

पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चौघांचा मृत्यू; २० महसूल मंडळात अतिवृष्टी

औरंगाबाद : मराठवाडय़ात गेल्या चार दिवसांपासून सुरू असणारा पावसाचा जोर रविवारी ओसरला असला तरी शनिवारी रात्री औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला.  २० महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून नद्या, नाले यांना पूर आले आहेत. विविध जिल्ह्यांत पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने चौघांजणांचा मृत्यू झाला आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सोयगाव देवी येथील दोघेजण वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे रविवारी सकाळी स्पष्ट झाले. अंबड-घनसावंगी तालुक्यात सिंदखेड येथील पूल वाहून गेला तर नांदेड जिल्ह्यातील मालेगाव रस्त्यावर पासदगावजवळ आसना नदीवर एक कार नदीत वाहून गेल्याने दोघांचा मृत्यू झाला. दरम्यान जायकवाडी धरण ९६.५३ टक्के असून ५६ हजार ६०० प्रतिसेकंद वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असून तो वेग दुपारनंतर कमी करण्यात आला.

जायकवाडी धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडल्यानंतर नांदेडपर्यंतच्या नदी काठच्या गावांना सतर्कचे आदेश देण्यात आले होते. मात्र, शनिवारी रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला. मराठवाडय़ात औरंगाबाद आणि जालना या दोन जिल्ह्यांत पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबाद जिल्ह्यातील चार महसूल मंडळात चार अतिवृष्टी नोंदविण्यात आली. पठण तालुक्यातील बिडकीन, खुलताबाद , सिल्लोड तालुक्यातील अजिंठा व सोयगाव तालुक्यातील सावळोद बाजार येथे ६५ मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस नोंदविण्यात आला. भोकरदन तालुक्यातील राजूर, जालना ग्रामीण, वीरेगाव, परतूर वाटूर तसेच घाणेश्वरी, जालना मंठा, तळणी, परभणी जिल्ह्यात पाथरी, जिंतुर सांगवी, औंधा जवळा येथे अतिवृष्टी नोंदविण्यात आली. भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी येथील २८ वर्षांच्या विलास सहाने व सात वर्षांच्या कल्याणी सहाने या दोघांचा वाहून गेल्याने मृत्यू झाला. विलास सहाने यांचा मृतदेह वलासा गावाजवळ सापडल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.  मालेगावहून नांदेडकडे येणारी कार नदीमध्ये कोसळली. मृत व्यक्तीचे नाव हरविंदरसिंग चड्डा असून महिलेची ओळख अद्याप पटली नसल्याचे सांगण्यात आले.

विष्णुपुरीतून विसर्ग

विष्णुपुरी जलाशयाच्या दरवाजातून एक लाख पाच हजार २०० प्रतिसेंकद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे जलसंपदा विभागातून सांगण्यात आले. दरम्यान या पावासामुळे शेतीचे प्रंचड नुकसान झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 21, 2020 12:12 am

Web Title: heavy rains in marathwada zws 70
Next Stories
1 पाचवीचा वर्ग जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती – शिक्षणमंत्री
2 उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न
3 औरंगाबादमध्ये ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा; कृत्रिम प्राणवायूचा पुरवठाही बेताचाच
Just Now!
X