औरंगाबाद : औरंगाबाद शहर व जिल्ह्य़ाच्या काही भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. जिल्ह्य़ाच्या अनेक भागांत गुरुवारपासून दररोज पाऊस हजेरी लावत आहे. रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली होती.

शनिवारीही शहर व परिसरात जोरदार सडाका येऊन गेला. पैठण तालुक्यातील ढोरकीन, इसारवाडी, ढाकेफळ आदी गावात गुरुवारी रात्री वादळी-वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेकडो हेक्टरवरील उसाचे पीक अक्षरश आडवे झाले. मोसंबी पिकाचेही नुकसान झाले. यापूर्वी जिल्ह्य़ात झालेल्या सरासरीपेक्षा अधिक पावसाने मुगाचे पीक हातचे गेले आहे. मुगाच्या शेंगांना झाडावरच असताना कोंब फुटले होते. सध्या सोयाबीन, मका, बाजरी, तूर, कापूस आदी पीक बहरात आले असून आधीच अति झालेल्या पावसामुळे हे पीकही धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.