औरंगाबाद-अजंठा-वेरुळ या पर्यटनस्थळांना आता लवकर पोचता येईल. मार्चच्या दुसऱ्या आठवडय़ात हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली.
पवन हंसचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बी. पी. शर्मा यांनी या बाबत सकारात्मक पाऊल उचलले असल्याचे खैरे यांना कळविले. शिर्डीसह हेलिकॉप्टर सेवा सुरू व्हावी, या साठी प्रयत्न सुरू होते. खैरे यांनी आपल्या प्रयत्नांमुळे ही सेवा उपलब्ध झाली असल्याचे सांगितले. या सेवेसाठी फर्दापूर येथे दोन हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. वेरुळ लेणीजवळ दोन हेलिपॅड उभारण्याचे काम शिल्लक आहे. हे काम पूर्ण होताच सेवा सुरू केली जाईल, असे डॉ. शर्मा यांनी खैरे यांना सांगितले. महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले व ऐतिहासिक स्थळांना विदेशी पर्यटकांनी भेट द्यावी म्हणून या योजनेचा लाभ होईल, असे मानले जात आहे. संसदीय समितीच्या बैठकीत या अनुषंगाने चर्चा झाली होती. केवळ मराठवाडय़ात नाही तर मुंबई-मुरुड-जंजिरा येथेही ही सेवा लवकरच सुरू होणार आहे.