अपघाताची काळजी म्हणून हेल्मेटसक्ती करण्याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घेतलेल्या निर्णयानंतर ज्याच्या त्याच्या तोंडी ‘हेल्मेट’ हाच शब्द होता. सकाळी नऊपासून शहरात २० ठिकाणी हेल्मेट परिधान न करणाऱ्या ५ हजार २३७ जणांकडून प्रत्येकी १०० रुपयांचा दंड पोलिसांनी वसूल केला. दिवसभर हेल्मेट दुकानांसमोर ग्राहकांच्या रांगा लागल्या होत्या. हेल्मेटच्या किमती थेट दोन हजार रुपयांपर्यंत गेल्या. दुचाकीवरून फिरणाऱ्या जवळपास ७० टक्के डोक्यावर हेल्मेट होते. त्यामुळे या सक्तीचे कौतुकही सुरू होते. दुसऱ्या बाजूला खराब रस्ते आणि सिग्नल सुविधा नीट नसतानाही केली जाणारी सक्ती खरेच आवश्यक आहे काय, असा प्रश्नही उपस्थित केला जात होता.
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या कामाचा धडाका औरंगाबादकरांना चांगलाच माहीत झाल्याने रविवारी दुपारपासूनच हेल्मेट खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी उसळली होती. कोणते हेल्मेट चांगले, दर्जा कसा चांगला हीच चर्चा ज्याच्या-त्याच्या तोंडी होती. सकाळी नऊपासून २० पोलीस निरीक्षक, ४५ सहायक निरीक्षक आणि ३०० पोलीस कर्मचारी २० ठिकाणी तैनात करण्यात आले होते. उघडे डोके दिसले की प्रत्येक चौकात दुचाकीस्वाराला बाजूला घेऊन दंड आकारला जात होता. सकाळपासून सुरू असणाऱ्या या कारवाईमुळे शहरात हेल्मेट सक्तीचे कौतुक सुरू होते. हेल्मेटमुळे अपघात घडलाच तर कमी दुखापत होईल, असे प्रबोधन सुरू होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार स्वत: हेल्मेट परिधान करून प्रबोधन करीत होते.
पुरेसा वेळ देऊन हेल्मेट सक्तीचे पाऊल उचलले त्यामुळे सकाळी पोलिसांना टाळून कसे जाता येईल, असा विचार दुचाकीस्वारांमध्ये होता. सक्ती केल्याने पकडले गेल्यानंतर महापालिकेच्या नावाने खडे फोडण्याचेही काम सुरू होते. हेल्मेट घालू हो, पण रस्ते ठीक करायला सांगा की, असे संवादही पोलिसांबरोबर सुरू होते. उद्या पुन्हा ही कारवाई अधिक जोरदार केली जाणार आहे.
शहरातील हेल्मेटच्या दुकानांमध्ये सोमवारी घासाघिसीचा व्यवहारच झाला नाही. दुकानदाराने किंमत सांगायची आणि ग्राहकाने ती द्यायची, असाच प्रकार सुरू होता. प्रत्येक हेल्मेटच्या दुकानासमोर दिवसभर रांगा होत्या. ८०० रुपयांपासून ते २ हजार रुपयांपर्यंत खरेदी-विक्री झाल्याने हा धंदा कोटय़वधींच्या घरात झाल्याचे सांगितले जाते. शिरस्त्राण डोक्यावर घातल्यानंतर सेल्फी काढण्याचे प्रकारही महाविद्यालयीन परिसरात पाहावयास मिळाले. शहरातील अनेक भागात जवळच जायचे असेल तरी हेल्मेट घेऊन जाणे ही नवी अडचण असल्याने सक्तीच्या कारवाईवर काहीजण नाराजही होते. मात्र, दिवसभर पोलिसांनी केलेल्या शिरस्त्राण सक्तीचे ‘कवतिक’ ज्याच्या-त्याच्या तोंडी होते.