संकटाच्या काळात खचून जाऊ नका. मदतीच्या रूपाने हजारो हात तुमच्या पाठीशी उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. दु:ख, वेदना व आत्महत्येचा विचार झुगारून नव्या स्वप्नांकडे पाहायला सुरुवात करा. आम्ही तुमच्यासोबत आहोत, अशा शब्दांत पुणे येथील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा दिला.
जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त, निराधार व आíथकदृष्टय़ा दुर्बल १०० कुटुंबीयांना पुणे येथील श्री चिंतामणी ग्रुप आणि साईबाबा मंदिर मंडळाच्या वतीने गुरुवारी अन्नधान्य, किराणा सामान व ब्लँकेट तसेच जनावरांना चारावाटप करण्यात आले. यंदा गणेशोत्सवावर खर्च न करता या पशातून शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला. या १०० लाभार्थ्यांना १० किलो ज्वारीचे पीठ, १० किलो तांदूळ, ५ किलो साखर, दोन किलो तूरडाळ, दोन किलो मसूर डाळ, पाच किलो बेसनपीठ, तेल, मीठ, तिखट, हळद यासह ब्लँकेटचे वाटप करण्यात आले.
उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे तेर, तावरजखेडा, कामेगाव, पानवाडी, म्होतरवाडी व सारोळा येथील ३८ लाभार्थ्यांना मदतीचा हात, तसेच ६० पशुपालकांना चारावाटप करण्यात आले. सारोळ्याचे उपसरपंच कैलास पाटील, सरस भारत अकादमीचे सुनील बडुरकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगदान दिले. दुपारी रुईभर येथे जयप्रकाश विद्यालयाच्या प्रांगणात बेंबळी, रुईभर व उस्मानाबाद येथील ३२ लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तू, १२ पशुपालकांना चारावाटप करण्यात आले. जि.  प. सदस्य रामदास कोळगे व सुभाष कोळगे यांची या वेळी उपस्थिती होती. लोहारा येथे स्थानिक पत्रकार संघाच्या मदतीने वडगाव, बेंडकाळ, धानुरी, सास्तूर आणि लोहारा येथील १९ लाभार्थ्यांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. पत्रकार संघाचे पदाधिकारी, तसेच सामाजिक कार्यकत्रे रमाकांत गायकवाड यांची उपस्थिती होती. तुळजापूर तालुक्यातील दहिटणा येथील १३ गरजूंना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.