शहरातील विविध ऐतिहासिक वस्तू, पर्यटनस्थळापासून औरंगाबाद पर्यटन प्रतिष्ठानतर्फे ‘हेरिटेज वॉक’चे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ, महानगरपालिका व विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या वतीने हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. पहिला ‘वॉक’ येत्या शनिवारी (६ ऑगस्ट) डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सोनेरी महल परिसरात सकाळी ७ ते ९ दरम्यान हा कार्यक्रम होईल. या वेळी विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, मनपा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, ‘एमटीडीसी’चे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ‘हेरिटेज वॉक’चे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये नौखडा पॅलेस (३० ऑगस्ट), सिद्धार्थ उद्यान (३ सप्टेंबर), मराठवाडा मुक्तिसंग्राम संग्रहालय (१८ सप्टेंबर), औरंगाबाद लेणी (१ ऑक्टोबर), बीबी का मकबरा, भडकल गेट (१५ नोव्हेंबर), सलीम अली सरोवर (५ नोव्हेंबर), नहर-ए-अंबरी (१९ नोव्हेंबर), छत्रपती शिवाजीमहाराज वस्तुसंग्रहालय (३ डिसेंबर) व गुलशन महल येथे १७ डिसेंबर रोजी सकाळी ७ ते ९ ‘हेरिटेज वॉक’ होणार आहे. शहरवासीयांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कुलसचिव प्राचार्य डॉ. प्रदीप जब्दे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. सुहास मोराळे यांनी केले आहे.