महात्मा गांधींच्या ‘सत्याचे प्रयोग’च्या खपात घट

सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

औरंगाबाद : अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या ‘माईन काम्फ’ अर्थात ‘माझा लढा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकाच्या खपात तीन वर्षांपासून वाढ होत आहे, तर त्या तुलनेत महात्मा गांधी यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या आत्मचरित्राची विक्री घटत असल्याची वस्तुस्थिती आहे.

राजकारणात ‘हिटलर’ हे प्रतीक वापरून होणारी टीका-टिप्पणी, वृत्तवाहिन्यांवरील चर्चामध्ये होणारा हिटलरचा उल्लेख एवढय़ापुरताच आता हिटलर मर्यादित राहिला नाही, तर त्याच्या ‘माईन काम्फ’ या त्याच्या जाहीरनामावजा आत्मचरित्राच्या कमी किमतीतील आवृत्तीला ग्रंथप्रदर्शनांमध्ये चांगली मागणी आहे.

हिटलर, नेपोलियन यांची चरित्रे अधिक वाचली जातात. चरित्रग्रंथ आणि आत्मचरित्रात्मक पुस्तकांमध्ये महात्मा गांधी यांच्या ‘सत्याचे प्रयोग’ या ग्रंथालाही चांगला प्रतिसाद मिळतो, परंतु ही संख्या तुलनेने घटली आहे. २०१६ पासून ग्रंथविक्रीतील अशा प्रकारचा बदल लक्षणीय असल्याचे ग्रंथविक्रेते रवी काकडे यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडावर आधारित पुस्तकांच्या विक्रीत नेहमीच वाढ दिसून येते. तो आलेख दिवसेंदिवस वाढतच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ‘महामानव’ या पुस्तकाची विक्री तर थांबतच नाही, पण अलीकडच्या दोन वर्षांत ‘माईन काम्फ’च्या १० हजार प्रती विकल्या गेल्या असल्याचे ‘अजब प्रकाशन’चे मनोज साळुंखे यांनी सांगितले.

औरंगाबाद शहरातील महात्मा फुले चौकाच्या जवळील बलवंत वाचनालयाच्या सभागृहात कमी किमतीतील पुस्तकांचे प्रदर्शन गेल्या महिनाभरापासून सुरू आहे. अनेक गाजलेली पुस्तके येथे जास्तीत जास्त १०० आणि कमीत कमी ७० रुपयांना मिळतात. पण ‘माईन काम्फ’च्या मराठी आणि इंग्रजी आवृत्यांची विक्री लक्षणीय आहे.

औरंगाबाद येथील प्रदर्शनात महिनाभरासाठी ५०० प्रती आणल्या होत्या. त्यातील मोजक्याच १०-१२ प्रती शिल्लक आहेत, तर नेपोलियनवरील पुस्तकाच्या ४०० पैकी १०० प्रती शिल्लक आहेत. वादग्रस्त व्यक्तिमत्त्वांच्या अनुषंगाने पुस्तक विक्रीत वाढ होत आहे असे म्हणता येत नाही. याच प्रदर्शनात दुर्योधनावरही पुस्तक आहे, पण त्याला फारसा प्रतिसाद नाही. बाजीराव-मस्तानीसारखे पुस्तकही कमी किमतीत असतानाही वाचक ते खरेदी करत नाहीत, असे ग्रंथविक्रेते सांगतात.

हिटलरचे आकर्षण की कुतूहल?

हिटलरच्या ‘माईन काम्फ’ची विक्री का वाढत आहे? त्याच्याबद्दलचे आकर्षण की त्याचे विचार जाणून घेण्याविषयीचे कुतूहल? या संदर्भात ग्रंथविक्रेत्यांना ठोस सांगता येत नाही. परंतु एककल्ली वृत्तीचा आक्रमक आणि विशिष्ट समुदायाला जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हिटलरचे विचार जाणून घेण्याची जिज्ञासा अलीकडच्या काळातच बळावल्याचे निरीक्षण विक्रेते नोंदवतात.