सोलापूरच्या पंडित गुलाम दस्तगीर यांची माहिती

मुस्लीम समाजातील अत्यंत पवित्र मानला गेलेला कुराण-शरीफ हा धर्मग्रंथ संस्कृतमधून अनुवादित करण्यात आलेला आहे. सर्व दस्तावेज तयार आहेत, केवळ त्याचे मुद्रण बाकी आहे ते पशाच्या चणचणीमुळे! सोलापूर येथील संस्कृत पंडित, वेदाचे गाढे अभ्यासक पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्या लेखणीतून हा कुराण-शरीफ संस्कृतमधून साकारला आहे.

औरंगाबाद येथील तीन दिवसीय वैदिक संमेलनाचे खास निमंत्रित असलेले पंडित बिराजदार यांचा वेदाचे अभ्यासक, पंडित म्हणून येथे रविवारी झालेल्या समारोप कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. मुस्लीम व्यक्ती ही वेदाचे अभ्यासक, ही या संमेलनात चच्रेचा आणि कुतुहलाचा विषय ठरली होती. या कार्यक्रमानंतर त्यांनी ‘लोकसत्ता’शी साधलेल्या संवादात संस्कृतमधून कुराण-शरीफ गं्रथ तयार असल्याचे सांगितले. मागील काही वर्षांपासून कुराण-शरीफ हा मुस्लीम धर्मीयांचा पवित्र ग्रंथ संस्कृतमधून अनुवादित करण्याचे काम हाती घेतले होते. ६०० पानांचे हस्तलिखित दस्तऐवज सध्या तयार आहे. अनेक अडचणींचा सामना करीत, अभ्यासांती हा ग्रंथ तयार केलेला आहे. विशेषत शब्दांच्या मोठय़ा अडचणी होत्या. मराठी, उर्दू, इंग्लिश भाषेतील शब्दकोश हाताळले. संस्कृतच्याही शब्दांचा अभ्यास केला. मागील दोन वर्षांपूर्वीच ग्रंथाचा संस्कृतमधून अनुवाद पूर्ण झालेला आहे. मात्र, त्याच्या मुद्रणासाठी सध्या आपली आर्थिक जुळवाजुळव सुरू आहे. यापूर्वी ‘वेदादि-शोधबोध’सारखी वेदाच्या अभ्यासावरील काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्याच्या मुद्रण खर्चातीलच एक लाख रुपये द्यायचे बाकी आहेत. आपण एक निवृत्त शिक्षक आहोत. गं्रथ छापण्याएवढे बळ आपल्याकडे नसले तरी संस्कृतमधून अनुवादित केलेल्या ‘कुराण-शरीफ’ या ग्रंथासाठी पशांची जुळवाजुळव सुरू आहे. अजून मुद्रणभार सोसण्यासाठीचे हात पुढे आले नाहीत, असे पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांनी सांगितले.

वंदेचा अर्थ सलाम, वाद निर्थक

मुस्लीम समाजातील काही प्रमुख नेत्यांनी ‘वंदे मातरम’ वरून निर्माण केलेला वाद निर्थक असून द्वेष्टेपणातून आलेला आहे. वास्तविक वंदे म्हणजे नमन किंवा सलाम. मुस्लिमांनी तो झुकणे किंवा शब्दकोशातील नमस्कार अशा अर्थातून घेतला आहे. भू मातेला सलाम, असा त्याचा सरळ अर्थ आहे. त्याला विरोध करण्याचे कारणच नाही. कुराणमध्येही आईला सलाम करावा, आईच्या पायात स्वर्ग आहे, असे म्हटलेले आहे. नमाज पढतेवेळी माथा कोठे टेकवला जातो तर तो जमिनीवर. त्यामुळे ‘वंदे मातरम’ला विरोध करणे चुकीचे आहे. द्वेष-भावनेतून हा विरोध आहे, असे पंडित बिराजदार यांनी सांगितले. मुस्लिमांनीही वेद शिकायला हवा, िहदूंनीही कुराण समजून घ्यायला हवे. किंबहुना वेद-कुराण हे सर्व जगाने आत्मसात करायला हवे, असे आवाहन करून पंडित बिराजदार हे वेद स्त्रियांनीही पठण करावेत, असे सांगतात. त्यासाठी ते मनुस्मृतीतील ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता! यत्रतास्तु न पूज्यन्ते सर्वास्त त्राफला: क्रिया: !! या ओवीचा संदर्भ देतात.

उपाधी, पुरस्कारांचे मानकरी

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार हे मूळचे सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील. सोलापुरातील मनपाच्या संस्कृत शाळेत त्यांचे शिक्षण झाले. पुढे वेदांचा अभ्यास सुरू केला. त्यांना वाराणसी येथील महापण्डित, पण्डितेंद्र, सोलापूरचा संस्कृतरत्नम, उज्जनचा परशुरामश्री, नाशिकचा विद्यापारंगत व तिरुपतीचा वाचस्पती, अशा उपाधींनी गौरवण्यात आले. राज्य, राष्ट्रीय स्तरावरील सुमारे १८ पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. नुकताच त्यांच्या नातीचा विवाह झाला. त्याची लग्नपत्रिकाही संस्कृतमधून व वेदाच्या ऋचांचा समावेश करून मुद्रित केली होती.