औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथे काही युवक गुंडगिरीच्या जोरावर दुकानदारांना धमक्या देऊन लुटपाट करतात. शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींची छेड काढणे, फुटकळ व्यापाऱ्यांकडून पसे उकळणे असे प्रकार सतत करतात. शुक्रवारी एकता चिकन सेंटरच्या दुकानदाराला धमकावून त्याच्याकडील रोख ३० हजार रुपये लुटले. या रोजच्या गुंडगिरीला कंटाळून जवळाबाजार येथील व्यापाऱ्यांनी शनिवारी दुकाने बंद ठेवत हट्टा पोलीस चौकीत निवेदन देऊन निषेध व्यक्त केला.
जवळाबाजार येथे मोठी लोकवस्ती असून शाळा, महाविद्यालयासोबत मोठी व्यापारी बाजारपेठ आहे. परंतु येथे असोला येथील काही गुंडवृत्तीचे युवक व्यापाऱ्यांना धाक घालून त्यांच्याकडून पसे उकळतात. इतकेच नाही तर शाळा-महाविद्यालयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनासुद्धा त्रास देतात. व्यापाऱ्यांना मारहाण करून त्यांच्याकडून पसे लुटतात, असे प्रकार नेहमीच घडतात. काही दिवसांपूर्वी एका भंगारवाल्यास मारहाण करून त्याचे नुकसान केले होते.
या घटनेची चर्चा थांबते न थांबते तोच असोला येथील गुंडवृत्तीच्या युवकांनी जवळाबाजार येथील एकता चिकन सेंटर या दुकानदारास मारहाण करून त्याच्याकडील रोख ३० हजार रुपये लुटले व त्याच्या दुकानातील १० हजारांच्या साहित्याचे नुकसान केले. या प्रकरणी दुकानदाराने पोलिसांत आरोपींविरुद्ध तक्रार दिली असता पोलिसांनी गुंडवृत्तीच्या युवकांविरुद्ध किरकोळ १०७ कलम लावून गुन्ह्याची नोंद केली. मात्र, प्रत्यक्षात या युवकांविरुद्ध ठोस कारवाई केली नाही. वारंवार घडणाऱ्यां घटनांकडे पोलीस दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
या पाश्र्वभूमीवर सरपंच शिवदास दमाने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मुनीर पटेल, माजी सरपंच डॉ. रमेश नवले, डॉ. जयप्रकाश मुंदडा बँकेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, शेख साबेर, रमेश झांजरी आदींनी व्यापाऱ्यांची बठक घेतली. बठकीत ठरल्याप्रमाणे शनिवारी व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून हट्टा पोलिसांत गुंडगिरीला आळा घालण्याच्या मागणीचे निवेदन दिले.