शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा शुल्कवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देऊन मोर्चा काढण्यात आला. रुग्णसेवा शुल्कवाढीचा निर्णय रद्द न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे राज्यभरात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
राज्य सरकारने गेल्या २८ डिसेंबरला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासकीय रुग्णालयात रुग्णसेवा शुल्कवाढीचा निर्णय घेतला. हा निर्णय अन्यायकारक असून दुष्काळग्रस्तांच्या दुखावर मीठ चोळणारा आहे. या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने सोमवारी एल्गार पुकारला. येथे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करून मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
श्रीमती खान यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सर्व नेते जनतेच्या मदतीस धावून जात असत. मात्र, अच्छे दिनच्या घोषणा देऊन सत्तेत आलेले भाजप-सेनेचे नेते सर्वसामान्य जनतेला विसरले आहेत, असा आरोप केला. दुष्काळाच्या गंभीर परिस्थितीत जनतेची लूट करणारा शासन निर्णय काढून युती सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली आहेत. हा निर्णय रद्द झालाच पाहिजे. हा निर्णय रद्द न झाल्यास राष्ट्रवादी महिला काँग्रेस राज्यभरात सरकारच्या विरोधात आंदोलन करेल, असा इशारा दिला.
आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्यास आरोग्य विभागासाठी कोटय़वधीचा निधी आणून अनेक विकासकामे केली. परंतु निधीअभावी बरीच कामे प्रलंबित आहेत. मागील दीड वर्षांत कामे का झाली नाहीत, असा सवाल डॉ. खान यांनी उपस्थित केला. आमदार रामराव वडकुते यांनी युती सरकार हे जनतेला धोका देणारे सरकार आहे, असा आरोप केला. परभणी शहर जिल्हाध्यक्ष स्वराजसिंह परिहार, राष्ट्रवादी महिला काँग्रेस सहसचिव सोनाली देशमुख, महापौर संगीता वडकर, गंगाधर जवंजाळ, जलील पटेल, शशिकला चव्हाण, नंदा राठोड, नंदिनी पानपट्टे आदींची भाषणे झाली.