पाणीटंचाईच्या झळा लातूरकरांना दिवसेंदिवस असह्य़ करून टाकत आहेत. टँकरच्या पाणीपुरवठय़ावरून हाणामाऱ्यांचे प्रकार घडत असतानाच पाण्याअभावी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्वोपचार रुग्णालयात एकही शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक िशदे यांनी म्हटले आहे. शहरात रुग्णालयाची प्रचंड मोठी संख्या आहे.
गेल्या १५ दिवसांपासून रुग्णालयास महापालिकेने पाणी पुरवले नाही. रोज २ लाख लिटर पाण्याची गरज आहे. बाहय़रुग्ण विभाग, रुग्णालयातील इमारती, २०० खाटांचे रुग्णालय, विद्यार्थी, विद्याíथनी वसतिगृह, कर्मचाऱ्यांच्या घराची गरज हे लक्षात घेता रोज २ लाख लिटर पाणी लागते. पाण्याअभावी शस्त्रक्रिया करणे अशक्य असल्याचे डॉ. िशदे यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी महापालिका व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना रुग्णालयाच्या वतीने पाणीपुरवठा करण्यासंबंधी निवेदनही देण्यात आले.
महापालिका आयुक्त सुधाकर तेलंग यांनी लातुरात तीव्र पाणीटंचाई आहे. त्यामुळे आम्ही टँकरद्वारे पाणीपुरवठा करीत आहोत. शासकीय रुग्णालय असल्यामुळे रुग्णालय चालवण्यापुरते पाणी देण्यासंबंधी रुग्णालयाच्या मंडळीशी चर्चा केली जाईल. मात्र, विद्यार्थी वसतिगृह व इतरांना पाणीपुरवठा करणे अशक्य आहे. महाविद्यालयाने या साठी खाजगी टँकर खरेदी करण्याला पर्याय नाही, असे स्पष्ट केले. माईर्सच्या एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयात दररोज २५ टँकर पाणी खरेदी केले जात आहे. महाविद्यालयाचा पसारा मोठा असल्यामुळे पाणी विकत घेण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असे प्राचार्या सरिता मंत्री यांनी सांगितले. पाणीटंचाईमुळे पसे देऊनही पाणी मिळत नाही, अशी स्थिती दोन महिन्यांतच निर्माण होणार आहे. साहजिकच रुग्णालय व महाविद्यालय चालवायचे कसे? हा गंभीर प्रश्न बनल्याचे त्या म्हणाल्या.
विवेकानंद रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी अनिल अंधोरीकर यांनी २०० खाटांचे रुग्णालय व अन्य रुग्णांसाठी दररोज सुमारे १५ हजार लिटर पाणी लागते. एका िवधनविहिरीद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र, महिनाभरातच पाणी कमी होईल व विकत घेण्याला पर्याय राहणार नाही. पाणी विकत मिळणेही अवघड झाले तर रुग्णालय चालवायचे कसे? हा प्रश्न अनुत्तरीत असल्याचे सांगितले.
दृष्टिक्षेपात आकडेवारी
शहरात ५०० पेक्षा अधिक डॉक्टर्स असून सर्व रुग्णालयांतील खाटांची बेरीज ५ हजारांपेक्षा अधिक आहे. केवळ रुग्णालयासाठी रोज १० लाख लिटर पाण्याची गरज आहे. िवधनविहिरी व टँकरद्वारे ही गरज तूर्त भागवली जात आहे. मात्र, उन्हाळय़ात पाण्याअभावी रुग्णालये बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. अचानक उद्भवणाऱ्या आजारावर उपचार करायचा कसा? प्रसूतीसाठी मोठय़ा प्रमाणावर पाणी लागते. अशा रुग्णांसाठी काय सोय करायची? या प्रश्नाने वैद्यकीय विश्वही चिंतेत आहे.