27 November 2020

News Flash

मजुरी वाढली म्हणून आनंद कसा मानायचा?

ऊस तोडणी मजुरांचा सवाल

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

सकाळी साडेचार वाजता हाडं गोठविणाऱ्या थंडीमध्ये उसाच्या फडात जायचं. दोन-अडीच तास तोडणी करत जायचे. मग भाकरी बडवायच्या. न्याहरी केली तर केली. पुढे २०-२५ किलोची मोळी बांधायची. आणि ट्रॅक्टर, मालमोटार किंवा बैलगाडीत ती भरायची. जेव्हा गाडी भरेल तेव्हा काम संपवायचे. एकदा परत गेलेली गाडी रात्री परत आली तर पुन्हा राबणे सुरू. दिवसभरात टन-सव्वाटन ऊसतोडणी होते. या वर्षी तोडणीमध्ये वाढ झाली आहे म्हणे. पूर्वी प्रतिटन २३९.५० पैसे भाव होता आता तो २८ ते ३२ रुपयांनी वाढेल असे सांगण्यात आले आहे. त्याचा आनंद मानायचा आणि दिवस ‘गोड’ व्हावा म्हणून राबत राहायचे.

मुदखेड तालुक्यातील शिवारात शिलाबाई कोलते आणि त्यांच्या समवेत १० कोयते म्हणजे २० मजूर ऊसतोडणीच्या कामाला लागलेले. या वर्षी अतिवृष्टीमुळे वाहने फडापर्यंत जाण्याला मोठा गतीरोधक. त्यामुळे मोळी बांधल्यावर ती मालमोटारीपर्यंत उचलून नेण्याचे अंतर वाढलेले. पण या क्षेत्रातील श्रमतास आणि मजुरी याचे प्रमाण कधी शास्त्रीय पद्धतीने मोजलेच गेले नाही. एका जोडप्याला दिवसाला ५०० ते ६०० रुपये मजुरी मिळेल एवढेच स्वरूप राहावे, अशी तोडणी क्षेत्राची रचना. पुजाताई वाघमारे यांना एक मूल. वर्षांच्या मुलाला घेऊन त्या फडात आलेल्या. त्यांनी तिथेच उसाचा बिछाना केला. त्यावर मुलाला टाकले आणि शेजाऱ्याच्या मुलाला त्याला खेळवायला लावले. त्या दिवसभर राबत राहिल्या. मध्येच मुलाला अंगावरचे दूध पाजायचे म्हणून थांबायच्या. त्यानंतर पुन्हा तोडणी आणि मोळी बांधण्याचे काम सुरू. पहाटेपासून रात्री जेव्हा गाडी येईल तेव्हापर्यंत. साखरेचे दर, त्याच्या निर्यातीवरील बंदीची तसेच इथेनॉल उत्पादन वाढीची चर्चा सुरू असताना उसाच्या फडातील वास्तव मात्र बदलत नाही. स्थलांतर मजूर अशी ओळख असणाऱ्या बीड जिल्ह्य़ात ऊसतोडणीच्या क्षेत्रात काम करणारे दीपक नागरगोजे म्हणाले, ‘या क्षेत्रातील समस्यांकडे कोणी गांभीर्याने पहात नाही. आता नववी आणि दहावीच्या शाळा सुरू करण्याचा विचार सरकार करत आहे. पण बीड जिल्ह्य़ातील सुमारे १५ हजार मुले फडामध्ये आई-वडिलांना मदत करण्यासाठी म्हणून जातात. त्यांना परत कसे आणणार? दरवर्षी मजुरांच्या मुलांसाठी वसतिगृह सुरू होतात. या वर्षी ती करता येणार नाहीत. मग या मुलांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न खिजगणतीतही नाही.’  साखरेचा गोडवा टिकवून ठेवण्यासाठी काम करणाऱ्या मजुरांच्या आयुष्यात दीपावलीचा प्रकाश कधी येईल माहीत नाही. ऊसतोडणीमध्ये वाढ झाल्याचा आनंद राजकीय व्यक्ती साजरा करतील. फडातील वास्तव अधिक भीषण होताना दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2020 12:12 am

Web Title: how to celebrate the increase in sugarcane harvesting wages abn 97
Next Stories
1 ऊसतोडणीला सुरुवात.. कष्टाच्या चरकात ६० हजार विद्यार्थी
2 फटाक्यांच्या उत्पादनात निम्म्यानी घट
3 भाजपमध्ये उमेदवारीचा गोंधळ
Just Now!
X