दुसऱ्या मजल्यावर बांबू लावून कॉपीचा पुरवठा

जिल्ह्यत कॉपीमुक्तीसाठी ५५ पथके नेमली गेली असली, तरी कॉपीमुक्तीचे मात्र धिंडवडे उडत आहेत. कन्हेरगावात तर बारावी परीक्षेसाठी चक्क दुसऱ्या मजल्यावर बांबूला कॉपी लावून अफलातून पद्धतीने विद्यार्थ्यांना कॉपीचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रशासन मात्र या प्रकाराकडे कमालीचे दुर्लक्ष करीत आहे.

जिल्ह्यत दहावी व बारावीच्या परीक्षा सुरू असून, कॉपीमुक्तीसाठी तब्बल ५५ बठे पथक व १० भरारी पथक नेमले असले, तरी जिल्ह्यत मात्र कॉपीमुक्तीचे धिंडवडे उडत आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर परीक्षेतील विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

कन्हेरगावात बारावीसाठी राष्ट्रीय महामार्गालगत जिल्हा परिषद शाळेत परीक्षेचे केंद्र असून, या परीक्षा केंद्रावर हाकेच्या अंतरावर पोलीस चौकी असताना शाळेत मात्र कॉपीचा सुळसुळाट होताना दिसत आहे. दुसऱ्या मजल्यावर बारावीचा शनिवारी क्रॉप सायन्सचा पेपर असताना दुसऱ्या मजल्यावर कॉपी पोचविण्यासाठी कॉपी बहाद्दरांच्या टोळक्याकडून लांब २० फुटांचा बांबू आणून त्याद्वारे कॉपी परीक्षार्थीपर्यंत पुरवठा करण्याची नामी शक्कल काढली. राष्ट्रीय महामार्गावर खुलेआम कॉपीचा पुरवठा होत असतांना परीक्षा केंद्रावरील बठे पथक, परीक्षेसाठी नेमण्यात आलेले पोलीस कर्मचारी मात्र या प्रकाराकडे डोळेझाक करत होते. परीक्षा केंद्रावर राजरोजपणे कॉपीचा पुरवठा केला जात होता. दुसरीकडे या केंद्रावर परीक्षार्थी पाणी मागत असले, तरी तीन तास पाण्याशिवाय राहू शकत नाही का, असा सवाल करत पाणीपुरवठ्याकडे दुर्लक्ष केले जात होते.