करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष

औरंगाबाद : जिथे-जिथे बाजार, तिथे-तिथे भाजी-फळ खरेदीसाठी झुंबड, असेच चित्र रविवारी औरंगाबादेत पाहायला मिळाले. शहरातील प्रमुख बाजारांच्या ठिकाणांचे विलगीकरण करण्यात आल्यानंतरही तेथील गर्दीचे प्रमाण काही कमी होत नसून करोनाचा फैलाव होण्याचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर ही गर्दीच प्रशासन आणि पोलिसांसाठीच डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

औरंगाबादेतील कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या जाधववाडीत उसळणाऱ्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने शहरातील वेगवेगळ्या ठिकाणांच्या मैदानावर बाजार भरवण्यासाठी जागा करून दिली. सुरुवातीला जळगाव रस्त्यावरील काही भागात शेतकरी, भाजी विक्रेते आणलेला भाजीपाला घेऊन बसायचे.

आता सिडकोतील एन-७ मधील पोलीस ठाण्याच्या जवळच असलेल्या रामलीला मैदानासह आमखास मैदान, हडकोतील फरशी मैदान आदी ठिकाणी बाजारांच्या स्थळांचे विलगीकरण करण्यात आले. मात्र, या ठिकाणीही गर्दी उसळत असल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले.

सिडकोतील रामलीला मैदानावर सकाळी सहापासूनच भाजी खरेदीसाठी गर्दी उसळत होती. सकाळी नऊनंतरही नागरिक भाजी खरेदीसाठी मैदानावर येत होते. अनेक नागरिक अजूनही सामाजिक अंतर राखण्याची खबरदारी घेताना दिसून येत नसून तोंडाला मास्क लावण्याची तसदीही त्यांनी घेतलेली नव्हती. तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी औरंगाबादेत अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याबाबतची भीती रामलीला मैदानावर भाजी खरेदीसाठी येणाऱ्यांना नव्हती. काही विक्रेतेही विना मास्कचीच भाजी, फळे विकत होते.

भाजी फेकण्यापेक्षा स्वस्तात दिलेली बरी

करोनाचा कहर सुरू झाल्यामुळे भाजी विक्रेत्यांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गाव-शेतातून आणलेला माल पुन्हा परत नेण्यापेक्षा आणि फेकून देण्यापेक्षा स्वस्तात दिलेला बरा, असा विचार शेतक ऱ्यांकडून केला गेल्याने रविवारच्या भाजीबाजारात स्वस्ताई दिसून आली. टोमॅटो, गवार, शेवगा, भेंडीसह पालेभाज्याही स्वस्तात विक्री होत होत्या. गवारचा दर १५ ते २० रुपये किलो एवढा कधी नव्हे खाली आलेला होता. टरबूज, द्राक्ष, मोसंबी, अननस ही फळेही तुलनेने स्वस्त होती. द्राक्ष ३० ते ४० रुपये किलो, तर टरबूज १० रुपये, पपई २० ते २५ रुपये किलोने अनेकांनी खरेदी केली.

गर्दीचा आढावा

शहरातील बाजाराच्या ठिकाणी होणाऱ्या गर्दीचा आढावा संबंधित पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडून घेण्यात आला आहे. गर्दी कशी कमी करता येईल, याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे उपायुक्त मीना मकवाना यांनी सांगितले.