News Flash

‘मानव विकास’मधून मराठवाडय़ात रोजगारवाढीचा प्रयत्न

प्रक्रिया उद्योग साहाय्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

प्रक्रिया उद्योग साहाय्यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद

मराठवाडय़ातील मागासपणावर उत्तर शोधण्यासाठी आता मानव विकास मिशनमधून रोजगारवाढीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. १२५ तालुक्यांऐवजी ही योजना आता अतिमागास २५ तालुक्यांनाच लागू होणार आहे. यात मराठवाडय़ातील हिंगोली आणि जालना जिल्हय़ाचा समावेश असेल. तूर, सोयाबीनसारख्या पिकांवर काही प्रक्रिया उद्योग उभे करण्यासाठी बचत गटांना निधी देण्यात येणार आहे. या योजनेसाठी शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मराठवाडय़ात उद्योगवाढीसाठी प्रक्रिया उद्योग बचत गटांनी उभारावेत व त्यासाठी आवश्यक ते साहाय्य मानव विकास मिशनमधून दिले जाणार आहे. उत्पन्नवाढीसाठीच्या योजनांची आखणी करण्यासाठी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर व कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी नुकताच म्हैसूर येथे दौरा केला. राष्ट्रीय अन्न व संशोधन संस्थेमध्ये सुरू असणाऱ्या प्रयोगाची माहिती त्यांनी घेतली. मराठवाडय़ासह राज्यातील विविध भागांत टोमॅटोचे उत्पादन मोठय़ा प्रमाणावर होते. मात्र, टोमॅटो फार काळ टिकत नसल्याने त्याचे विक्रीपूर्व आयुष्य वाढवता येऊ शकते काय, याची चाचपणी या संस्थेमार्फत सुरू करण्यात आली आहे.

बचत गटांना हे तंत्रज्ञान दिले किंवा त्याचे प्रशिक्षण देण्यासाठीची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मराठवाडा, विदर्भात तूर उत्पादन मोठय़ा प्रमाणात झाले. मात्र, त्याची साठवणूक करणे शक्य नव्हते. त्याऐवजी त्याची डाळ केली असती तर शेतकऱ्यांना अधिक रक्कम मिळाली असती. मात्र, असे प्रक्रिया उद्योग उभे केले जात नाहीत. हीच बाब सोयाबीनसाठीही लागू आहे. सोयाबीनपासून तेल काढण्याचे उद्योग बचत गटांनी करावेत, त्यासाठी आवश्यक ते साहाय्य करण्यासाठी  योजना सुरू केली जाणार आहे. अंडय़ापासून कुरकुरे तयार करणे किंवा मोसंबीपासूनचे पदार्थ बनविता येतात का, याची चाचपणी केली जात आहे. असे प्रयोग बचत गटांमार्फत करण्याची योजना तयार केली जात आहे. अद्याप कोणत्या जिल्हय़ातील किती तालुके या योजनेमध्ये घ्यावयाचे याचा निर्णय झाला नाही. मात्र, लवकरच तो पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले.

  • मानव विकास मिशनमधून आठवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना सायकल दिली जात असे. आतापर्यंत १ लाख ३२ हजार ९७५ मुलींना मोफत सायकल दिल्यामुळे त्यांची शाळेतील हजेरी वाढली आहे.
  • मानव विकासकडून पूर्वी आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून वाहतूक व्यवस्था करण्यात आली होती. ७२५ बस केवळ शिक्षणाच्या गावी पोचता यावे म्हणून देण्यात आल्या होत्या. त्यात वाढ करण्यात आली असून आता ८६८ बसमधून ९३ हजार ९८९ विद्यार्थी प्रवास करत आहेत. त्यामुळे त्यांची शिक्षणाची सोय झाली आहे. प्रतिबस १०८ विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
  • विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक जाणिवा वाढवाव्यात म्हणून करण्यात आलेल्या बालभवन विज्ञान केंद्राला २ लाख ६१ हजार विद्यार्थ्यांनी भेट दिली आहे. त्याचबरोबर ३ लाख ३६ हजार ७१९ गर्भवती महिला आणि १ लाख ८९ हजार ३६९ बालकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे.
  • गर्भवती मजूर महिलांची मजुरी बुडते म्हणून सुरू करण्यात आलेल्या बुडीत मजुरी योजनेत १ लाख ३९ हजार ६९९ महिलांना लाभ देण्यात आला. प्रतिमाम ४ हजार रुपये बुडीत मजुरी दिली जाते.

मानव विकास मिशनच्या विविध योजनांमध्ये आता रोजगार उपलब्ध होतील अशा योजना तयार केल्या जात आहेत. त्या त्या भागात येणाऱ्या पिकांवर प्रक्रिया उद्योग उभे करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळावे, अशा पद्धतीची रचना हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे मागास भागाच्या विकासाला त्याचा अधिक लाभ होईल.    – भास्कर मुंडे, (आयुक्त) मानव विकास मिशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 14, 2017 1:28 am

Web Title: human development mission in aurangabad
Next Stories
1 आवळला जाणारा फास सोडवताना..
2 सोयाबीननंतर तूर, हरभऱ्याची विक्रीही हमीभावापेक्षा कमी भावाने 
3 वैद्यनाथ दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा: धनंजय मुंडे
Just Now!
X