ऊन, वारा, पावसात रस्त्याच्या कडेला बसलेले अनेक निराधार मनोरुग्ण पहायला मिळतात. असे रुग्ण रस्त्याच्या कडेला पहिले की अनेक जण हळहळ व्यक्त करतात. अशा मनोरुग्णांना आधार देण्याचे काम पुण्यातील स्माईल प्लस सोशल फाऊंडेशन करते. औरंगाबाद महानगर पालिका आणि स्माईल प्लस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘करूया बेवारस मनोरुग्ण मुक्त शहर’ या मोहिमची सुरवात आज (रविवार) करण्यात आली. त्यासाठी शहरात ‘माणुसकीची रॅली’ काढण्यात आली. शहरातील क्रांती चौक येथून काढण्यात आलेल्या या रॅलीत निराधाराना देखील सहभागी करण्यात आले होते.

 

औरंगाबाद शहरात ४२ मनोरुग्ण रस्त्यावर बसत असल्याची माहिती स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनकडून देण्यात आली. त्याच्यासाठी ते काम करणार आहेत. महानगरपालिकेला या उपक्रमात सहभागी करण्यात आले आहे. स्माईल प्लस सोशल फाऊंडेशनचं राज्यभर काम सुरु असून न्यायालयाच्या परवानगीने निराधार मनोरुग्णांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. कोणाचे कुटुंबीय त्यांना घेण्यासाठी आले तर त्यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे स्माईल प्लस फाउंडेशनकडून सांगण्यात आले. स्माईल फाऊंडेशनचे योगेश मालखरे, महापौर नंदकुमार घोडेले, महानगरपालिका आयुक्त डी एम मुगळीकर, उपमहापौर विजय औताडे यांच्या उपस्थितीत रॅलीच उदघाटन करण्यात आले.