औरंगाबाद : वेळेला केळ किंवा पाव, हे साधारण प्रतिकूल परिस्थितीचे निदर्शक म्हणून वापरले जाणारे खाद्य जिन्नस. मात्र, यातील पाव निर्मितीचा उद्योगच प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत असून, टाळेबंदीमुळे अडचणीतही आला आहे. स्वस्तातील आणि गरिबांनाही परवडणारा पाव-ब्रेडचा खाद्यपदार्थ तयार होणेही बंद झाले आहे. त्यामुळे औरंगाबादमधील लहान-मोठय़ा उलाढालीतील जवळपास १०० च्या आसपास बेकरी उद्योग टाळेबंद अवस्थेत असून, हजार ते बाराशे कामगारांवरही बेकारीची कु ऱ्हाड कोसळली आहे.

बेकरीमध्ये तयार होणारा माल शहरासह ग्रामीण भागात व जिल्ह्य़ाबाहेरही पोहोचवण्यासाठी अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. बहुतांश माल हा एसटीने पाठवला जातो. मात्र, सध्या राज्य परिवहन महामंडळाच्याही एसटींची वाहतूक बंद पडल्यामुळे स्वतंत्ररीत्या वाहनाद्वारे माल पाठवणे परवडणारे नसते.  उत्पादित माल पाठवण्यात जशा अडचणी येत आहेत, तसेच कच्चा माल मागवण्यासाठीही येणारे अडथळे आहेतच, असे या क्षेत्रातील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

येथील बेकरी उद्योजक आतिक शेख म्हणाले, औरंगाबादमध्ये साधारण लहान-मोठय़ा १५० च्या वर संख्येने बेकरी खाद्य पदार्थ निर्मितीचे कारखाने असून यातील ७५ ते ८० टक्के उद्योग सद्य:स्थितीला टाळेबंद अवस्थेत आहेत. बेकरी मालासाठी मैदा, तेल, तुपासह पदार्थ फुगण्यासाठी वापरण्यात येणारे खमीरही आवश्यक असते. हे खमीर कोकणातील चिपळून येथून मागवले जाते. मात्र, सध्या खासगी व राज्य परिवहन महामंडळाचीही वाहतूक सेवा बंद असल्यामुळे खमीर मागवता येत नाही.