दारूच्या व्यसनावरून टोमणे मारणाऱ्या पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पतीनेही आत्महत्या केल्याची घटना वाळूज येथे उघडकीस आली. शनिवारी सकाळी हा प्रकार समोर आला. प्रवीण प्रभाकरराव पाटील व आरती प्रवीण पाटील असे मृत दाम्पत्याचे नाव आहे.

प्रवीण हा खासगी कंपनीत काम करत असे, तर आरती गृहिणी होती. त्यांना नऊ व दीड वर्षांची दोन मुले आहेत. प्रवीण राहत असलेल्या अपार्टमेंटमध्ये त्याचे आई-वडील, भाऊ स्वतंत्र सदनिकेत राहात होते. प्रवीणला मद्यपान करण्याची सवय होती त्यावरून पत्नी-पतीत वाद होता. वाद झाल्यानंतर रागाच्या भरात पत्नी दोन मुलांसह माहेरी गेली. शुक्रवारी पुन्हा मद्यपान करणार नाही, असे वचन पत्नी व सासू-सासऱ्यांना दिले. त्या दिवशी रात्री दोघांनीही आरतीच्या आई-वडिलांकडे जेवण केले आणि मध्यरात्री ते स्वत:च्या घरी परतले. मध्यरात्री प्रवीणने मुले झोपल्यानंतर आरतीचा गळा आवळून खून केला व स्वयंपाकघरात जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी साडेसहा-सातच्या सुमारास मुलांच्या शाळेची वेळ झाली तरी कोणीही झोपेतून का उठले नाही म्हणून प्रवीणचे सासरे पाहण्यास गेले असता त्याने गळफास घेतल्याचे दिसले. खालच्या मजल्यावर जाऊन प्रवीणचा भाऊ व आई-वडिलांना त्यांनी ही माहिती दिली. त्यांनी आतल्या खोलीत जाऊन पाहिले असता आरतीचा गळा आवळून खून केल्याचे दिसून आले. वाळूज एमआयडीसी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.