‘मी लिंगायत….माझा धर्म लिंगायत’, ‘एक लिंगायत कोटी लिंगायत’, ‘भारत देशा जय बसवेशा’, आशा घोषणांचे फलक हातात घेऊन लिंगायत धर्माला मान्‍यता मिळावी या मागणीसाठी अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीतर्फे औरंगाबादमध्ये रविवारी मोर्चा काढण्यात आला. लिंगायत समाजच्या या मोर्चाला मराठा सेवा संघानेही पाठिंबा दर्शवला आहे.


लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता आणि राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा द्यावा, या मागणीसाठी हा महामोर्चा काढण्यात आला. शहरातील क्रांती चौकातून विभागीय आयुक्त कार्यालय असा या मोर्चाचा मार्ग होता. हजारोंच्या संख्येने लिंगायत समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचा देखील लक्षणीय सहभाग होता.

समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे. सामाजिक समस्या आहेत. इतर धर्मांप्रमाणे लिंगायतांची विशिष्ट संस्कृती, आचरण पद्धती आहे. परंतू लिंगायत धर्माची शासकीय मान्यता हिरावून घेतल्याने सवलती मिळत नाहीत. धार्मिक अल्पसंख्यांकांच्या सर्व सवलती मिळाव्या यासाठी हा लढा उभारला असल्याचे मोर्चेकर्यांनी सांगितले. शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि माते महादेवी बेंग लुरू यांच्‍या मार्गदर्शनाखाली मोर्चाला सुरूवात झाली.

औरंगाबाद शहराच्या महापौरांसह शहरातील विविध राजकीय नेत्यांनी या मार्चाला भेट देऊन पाठिंबा दर्शवला. मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी शनिवारी जनजागृती रॅलीही काढण्यात आली होती. त्याला प्रतिसाद देत नागरिकही मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. तसेच मराठवडयाच्या सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्येने नागरिक मोर्चासाठी औरंगाबाद आले होते.