News Flash

‘आयसीटी’चे उपकेंद्र औरंगाबादमध्ये सुरु करण्याच्या हालचाली!

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर या उद्योजकांच्या संस्थेने या कामी पुढाकार घेतला आहे.

‘आयआयएम’ ही संस्था औरंगाबादेतून हलविण्याच्या राजकीय निर्णयाची भरपाई करण्यासाठी देशभरातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ म्हणून ओळख असणाऱ्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (आयसीटी) उपकेंद्र वा विस्तारीत शाखा औरंगाबादेत सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. जी. डी. यादव यांनी औरंगाबादेत ही संस्था सुरू होऊ शकते, असे शुक्रवारी सांगितले.
चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर (सीएमआयए) या उद्योजकांच्या संस्थेने या कामी पुढाकार घेतला आहे. त्याच बरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या संस्थेच्या कामासाठी सर्वतोपरी सहकार्याची भूमिका घेतली असल्याचे सांगितले जाते. या संस्थेसाठी २०० एकर जागेची आवश्यकता आहे. त्याची चाचपणी कुलगुरू यादव यांनी केली.
औरंगाबाद शहर हे या संस्थेसाठी कसे उपयुक्त ठरु शकेल, याची माहिती उद्योजक मुकंद भोगले यांनी कुलगुरू यादव यांना दिली. शहरात सध्या २८ नामांकित औषधी कंपन्या आहेत. तसेच प्लास्टिक उत्पादनातही शहर अग्रेसर आहे. त्याचबरोबर दिल्ली-मुंबई औद्योगिक पट्टयामुळे शहराचा विकास झपाटय़ाने होईल, असा दावा यादव यांच्यासमोर करण्यात आला.
दिवसभरात या संस्थेला आवश्यक त्या सर्व सुविधा मिळू शकतात काय, याची चाचपणी यादव यांनी केली. त्यांची प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्यासमवेतही चर्चा झाली. भाजपचे सरचिटणीस मनोज पांगारकर याच संस्थेत शिकलेले असल्याने ही संस्था मराठवाडय़ात यावी, या साठी ते प्रयत्न करीत होते. ही संस्था सुरू करण्यास राज्य सरकार व मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून परवानगी मिळाली की कामकाज सुरू करता येऊ शकेल, असे यादव यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मे महिन्यात या संदर्भातील मान्यता मिळाल्यास, जूनपासूनही रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कामकाज सुरू करता येईल, असे सांगण्यात आले. संस्थेचे कार्य अगदी पूर्ण ताकदीनिशी सुरू करता आले नाही तरी तातडीने काही अभ्यासक्रम लगेच सुरू करता येतील.
औरंगाबाद येथील या संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांला लगेच नोकरी मिळेल, असेच अभ्यासक्रम आखता येतील, असेही यादव यांनी सांगितले. मात्र, असे करण्यासाठी मुंबई परिसरात १०० एकर आणि औरंगाबाद येथे २०० एकर जागा आवश्यक आहे. शुक्रवारी दिवसभरात जल व भूमी व्यवस्थापन परिसरातील जागेचीही पाहणी करण्यात आली. तसेच अन्य पर्यायही तपासण्यात आले. ही संस्था औरंगाबाद येथे सुरू झाल्यास उद्योजकांना अधिक लाभ होण्याची शक्यता आहे. उपकेंद्र अथवा विस्तारित केंद्र सुरू करण्यास कुलगुरू यादव यांनी सकारात्मकता दाखविल्याने उद्योजकांनी त्याचे स्वागत केले. ही संस्था मराठवाडय़ात यावी, यासाठी सर्व साह्य़ केले जाईल, असे पांगरकर यांनी सांगितले. सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे, मुनिष शर्मा, उमेश दाशरथी, उपमहापौर प्रमोद राठोड, भगवान घडमोडे यांची उपस्थिती होती.

सगळे छान, शहर घाण!
रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रो. यादव यांनी संस्थेच्या जडणघडणीसाठी औरंगाबाद हे शहर अंत्यत सकारात्मक असल्याचे सांगितले. अगदी डीएमआयसी प्रकल्पातील अधिकाऱ्यांनीही ही संस्था येथे करावी, असा आग्रह केल्याचे सांगितले. मात्र, शहरातील घाणीवर नाराजी व्यक्त केली. माफ करा, हे शहर फार घाण आहे, असे ते म्हणाले. मात्र, काळजी करु नका, या संस्थेत प्रत्येक टाकाऊ पदार्थ वापरला जाऊ शकतो, हे शिकविले जाते. येथे आलो तर त्यावरही प्रयोग करू, असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 16, 2016 12:47 am

Web Title: ict sub centre in aurangabad
Next Stories
1 जि. प. पाणीपुरवठा विभागात साडेतीन कोटींचा घोटाळा
2 काँग्रेसअंतर्गत मरगळ घालविण्यास गावागावांत एकाच आकाराची पाटी!
3 भीमसागर उसळला
Just Now!
X