उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला; औरंगाबादमध्ये पाहणी दौरा

राज्यात सरकार स्थापनेवरून तर्कवितर्काना उधाण आले असताना,‘ हा जो परतीचा पाऊस येतोय, तो ‘मी परत येईन’ म्हणतोय, याची भीती वाटतेय लोकांना,’ या शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फटकारले. सत्तेत कोण बसणार, कोणत्या सरकारकडून मदत मिळते आहे, हे कसे कळेल, या प्रश्नाच्या उत्तरात ठाकरे यांनी लावलेला टीकेचा सूर एका बाजूला कायम होता. तर त्याच वेळी शेतीच्या नुकसानभरपाईसाठी केंद्र सरकारने मदत करावी व ती हेक्टरी २५ हजार रुपयांपर्यंत असावी असेही ते म्हणाले.

सत्तेचा सारिपाट मांडण्याच्या हालचाली सुरू असताना रविवारी औरंगाबाद जिल्हय़ातील कानडगाव व वैजापूर तालुक्यातील गारज या गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकार बैठकीमध्ये बोलत होते.

मोदी सरकारला शेतकऱ्यांनी भरघोस दिले आहे. आता कर्तव्य म्हणून त्यांनी मदत करण्याची भूमिका घ्यावी, अशी मागणी करत उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘राज्य सरकारने केलेली दहा हजार कोटी रुपयांची मदत खूप त्रोटक आहे.

अधिक मदत करण्यासाठी ‘ओला दुष्काळ’ ही संकल्पना सरकारमध्ये आहे की नाही माहीत नाही, पण केंद्र सरकारने यामध्ये मदतीची भूमिका घेण्याची गरज आहे.’’ गारज येथे शेतकऱ्यांशी संवाद साधतानाही सरकार बनविण्याची गडबड चालू राहील, पण संकटकाळी विश्वास देण्याकरता आलो आहे, असे सांगितले. नेता म्हणून नाही तर कुटुंबीय म्हणून आलो असून नेते येतात-जातात. नेता मोठा झाल्यावर तुम्हाला विसरतो. मात्र, तुम्ही अन्नदाता आहात. तुम्हाला मिळत नसेल तर या सरकारला अर्थ काय, असा सवालही त्यांनी केला. शेतकऱ्यांनी या वेळी वीज देयक माफ करण्याची मागणी केली. तसेच सरसकट कर्जमाफीची मागणी केली. आपले सरकार आल्यानंतर या मागणीची अंमलबजावणी आणूच, हे आपले वचन असल्याच्या वक्तव्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. गारज येथे भाषणादरम्यान एवढय़ा संकटकाळातही कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना नोटिसा येत असल्याचे सांगण्यात आले. त्याचा ठाकरे यांनी समाचार घेतला. विमा कंपन्यांना आम्ही सरळ केले होते. जर संकटकाळातील माणसांना असा त्रास देणार असाल तर या नोटिसा जाळा आणि बँकाकडेही पाहू, असे ठाकरे म्हणाले.

तरतूद वाढविण्याची मागणी

अटी न टाकता किंवा फार कागदी घोडे न नाचविता शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत केली जावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्यास कोरडवाहू शेतीसाठी सहा हजार आठशे, बागायती पिकांसाठी १३ हजार ५०० तर फळपिकांसाठी हेक्टर १८ हजार रुपयांची मदत करण्याची तरतूद आहे. मात्र, झालेले नुकसान लक्षात घेता करण्यात आलेली दहा हजार कोटी रुपयांची तरतूद कमी असल्याचे कृषी विभागातील अधिकारी सांगत आहेत. त्याला दुजोरा देत मूळ तरतुदीमध्ये वाढ करण्याची मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.

सरकार स्थापनेपूर्वी मराठवाडय़ाचा दौरा

२०१४ मध्ये सरकार स्थापनेच्या कालावधीमध्ये सर्व आमदार, खासदारांसह उद्धव ठाकरे यांनी मराठवाडय़ाचा दौरा केला होता. तेव्हा शिवसेना विरोधी पक्षात बसण्याची तयारी करत होती. मात्र, नंतर सेना सत्तेत सहभागी झाली होती, याची आठवण भाजप नेत्यांकडून केली जात होती.