शासनाचा महसूल बुडवून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर निलंगा तहसील कार्यालयाने धडक कारवाई करून सहा टिप्परसह पाच ट्रॅक्टर जप्त केले. या वाहनधारकांकडून २ लाख ६१ हजारांचा दंड वसूल करण्यात आला.
लिलावातील वाळू घाटाची मुदत ३० सप्टेंबर रोजी संपलेली असताना तालुक्यातील काही वाहतूकदार अवैध वाळूचा उपसा करत असल्याची माहिती तहसील कार्यालयाच्या गौण खनिज पथकास मिळाली. या माहितीच्या आधारे उपविभागीय अधिकारी डॉ. भवानजी आगे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार कृष्णकांत चिकुत्रे यांनी तत्काळ कारवाईसाठी पथक रवाना केले. तहसील कार्यालयाच्या पथकाने उदगीर रोड व लांबोटा या ठिकाणी रात्री २ वाजता सापळा रचला. यात उदगीर रोडवर निलंग्याकडे अवैध वाळू वाहतूक करणारे आठ टिप्पर पकडण्यात आले. दरम्यान दुसऱ्या दिवशी वाळूची अवैध वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर पहाटे ३ ते ६ च्या दरम्यान पकडण्यात आले. या सर्व वाहनधारकांकडून सुमारे २ लाख ६१ हजार ७५० रुपयांचा दंड महसूल प्रशासनाने वसूल केला.
या पथकात नायब तहसीलदार शिवाजी कदम, सौदागर तांदळे, मंडळ अधिकारी एस. बी. डोंगरे, एल. पी. देशपांडे, ए. आर. नेटके, तलाठी, तहसीलदार, सोळुंके, गायकवाड, सागावे, बोटुळे, खंदाडे, राठोड, कस्तुरे, कांबळे, बनसोडे, तावडे, आदींचा समावेश होता. यापुढे तालुक्यात अवैध वाळू वाहतूकदारांविरुद्ध कारवाईची मोहीम सुरू राहणार असून कोणीही अवैध वाळू उपसा किंवा गौण खनिजाची वाहतूक करू नये, असे आवाहन तहसीलदार कृष्णकांत चिकुत्रे यांनी केले आहे.