औरंगाबाद : उपमहापौरपदाच्या निवडणुकीत पक्षादेश न पाळल्यामुळे सहा नगरसेवकांचे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हकालपट्टी केली. या निवडणुकीत तीन नगरसेवकांनी सेना आणि भाजप पुरस्कृत उमेदवाराला मतदान केले. तर तीन नगरसेवक गैरहजर राहिले. पक्षादेश न पाळणे व महापालिकेत सतत गैरहजर राहणे, विरोधी उमेदवाराला मतदान करणे असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. सायराबानो अजमल खान, संगीता वाघुले, नसीमबी सांडुखान, विकास येडके, शेख समीना आणि सलिमा बाबुभाई कुरेशी अशी कारवाई करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहेत.

उपमहापौरपदाच्या निवडणुकीत एमआयएमचे उमेदवार शेख जफर बिल्डर यांना १३ मते मिळाली. एमआयएमचे २५ नगरसेवक आहेत. यातील दोघांची आधीच हकालपट्टी करण्यात आली होती. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर तीन मते फुटल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे इम्तियाज जलील यांनी दुपारी जाहीर केले. एमआयएमचा एक नगरसेवक सध्या कारागृहात आहे. शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांना दोन नगरसेवकांनी मतदान केल्याचे स्पष्ट झाले.

२४ पैकी १६ जणांनी मतदानात सहभाग घेतला, तर उर्वरित आठ जण गैरहजर राहिले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएममध्ये पडलेली ही फुट नेतृत्वाच्या जिव्हारी लागल्याचे सांगण्यात येत आहे.