उंटावरून शेळ्या हाकणं… ही म्हण प्रत्येकानं ऐकली असेल. मात्र, तसा प्रकार कधी पाहिला नसेल. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथील नागरिकांना या म्हणीचा प्रत्यय आता आहे. वैजापूर भागात कृषी अधिकाऱ्यांनी चक्क घोड्यावर बसून बोंडअळीचे पंचनामे केल्याचा अजब प्रकार घडला आहे. सरकारकडून दिलेल्या मुदतीत पंचनामे करायचे आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून घोड्याचा वापर करण्यात येत आहे. या संदर्भात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याशी संवाद साधला असता. हा प्रकार म्हणजे ‘वराती मागून घोडे’ असल्याची टीका त्यांनी केली. तसेच पंचनाम्यांचा फार्स न करता सरसकट मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी ‘लोकसत्ताच्या प्रतिनिधीशी’ बोलताना केली.

मोठ्या मेहनतीने पिकवलेले पांढरे सोने बोंडअळीमुळे मातीमोल झाले. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी अधिकाऱ्यांना डेडलाईन दिल्यामुळे त्यांच्याकडून घोड्यावर बसून पंचनामे केले जात आहेत. तालुक्यातील अंचलगाव येथे मंगळवारी तलाठी पैठणपगारे व इतर कर्मचारी चक्क घोड्यावर बसून हे पंचनामे पूर्ण करीत असल्याचे दिसले. अधिकारी शेताच्या बांधावर घोड्यावर बसलेले पाहून परिसरात चांगलीच चर्चा रंगली होती. तालुक्यात नुकसानीचे क्षेत्र जास्त असल्याने त्यांनी हा मार्ग अवलंबला असल्याची शक्यता आहे.

‘घोड्यावर बसून बोंडअळी मुळे झालेल्या नुकसानीची पाहणी, पंचनामे करण्याचा हा प्रकार म्हणजे मराठीतील ‘वरातीमागून घोडे’ या म्हणी प्रमाणे आहे. मुळात शेतक-यांच्या कापसाचे बोंडअळी मुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. शेतक-यांनी शासनाच्या पंचनामे आणि मदतीच्या जाचक अटी पाहून मदतीची आशा सोडून देत कापसाचे पीक केव्हाच मोडून काढले आहे, अशा वेळी हा पंचनाम्याचा केवळ देखावा असून तो शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे. उंटावरून शेळ्या हाकणे हा वाक्यप्रचार माहीत होता आता भाजपच्या राज्यात घोड्यावरून पंचनामे हा नवीन वाक्यप्रचार रूढ होईल. सरकारला शेतक-यांना खरोखरच मदत करायची असेल तर बोंडअळीचे नैसर्गिक संकट जाहीर करून पंचनाम्याचा फार्स न करता सरसकट एकरी २५ हजार रुपये मदत जाहीर केली पाहिजे’ असे मतं विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.