News Flash

औरंगाबाद शहरात साडेचार हजार टन कचरा साचला

तोडगा न निघाल्यास आयुक्तांच्या निलंबनाचा न्यायालयाचा इशारा

औरंगाबाद शहरात झालेल्या कचराकोंडीमुळे सुमारे साडेचार हजार टन कचरा साठला आहे.

औरंगाबाद शहरात अभुतपूर्व ‘कचराकोंडी’ झाली असून रस्त्यावर आणि कचरा वाहतूक गाड्यांमध्ये जवळपास ४ हजार ५०० टन एवढ्या मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. शहराच्या कचराकोंडी प्रकरणावर मुलभूत सुविधा देण्यास पालिका अपयशी ठरत असल्याने पालिकेला न्यायालयाने फटकारले आहे. कचरा प्रश्न सोडवण्यास आयुक्त अपयशी ठरल्याने त्यांच्या निलंबनाचे आदेश आम्ही देऊ शकतो असा सज्जड दम न्यायालयाने बुधवारी दिला आहे.

पालिकेकडून कचरा प्रश्नावर लवकरच प्रक्रिया प्रकल्प सुरू करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यावर सोमवारपर्यंत शपथपत्र सादर करण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या. घनकचरा व्यवस्थापन तरतूद झाल्यापासून पालिकेने कचरा प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहिलेले नाही. त्यावर न्यायालयाने पालिका प्रशासनाला चांगलेच फटकारले. कचऱ्यासंबंधीच्या प्रश्नावरील जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांच्या खडपीठासमोर सुनावणी सुरू आहे.

नागरिकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करणे प्रशासनाचे कर्तव्य आणि जबाबदारी आहे. ही समस्या सोडविण्यासाठी मनपा प्रशासनाला अपयश आल्यास सर्वसामान्य नागरिकांचे हित आणि आरोग्य लक्षात घेऊन राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करणे आवश्यक आहे, असे खंडपीठाने स्पष्ट केले. कचरा डेपोसाठी महापालिकेच्या मालकीच्या महापालिका हद्दीत किती मोकळ्या जागा आहेत याची माहिती मनपा प्रशासनाने खंडपीठास द्यावी, असे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार मिटमिटा येथील सफारी पार्कच्या जागेचा पर्याय सुचवत नारेगाव येथे कचरा टाकण्याची मुदत मागण्यात आली. मात्र, नारेगाव येथे कचरा टाकण्यास विरोध दर्शवत सोमवारपर्यंत शपथपत्र सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने केल्या आहेत.

सुनावणीदरम्यान पोलिसबळाचा वापर करून कचरा टाकणार असल्याचे बोलले जातं असल्याचे नारेगाव परिसरातील नागरिकांच्या वकिलांनी कोर्टासमोर सांगितले. गेल्या ३० वर्षांपासून परिसरातील नागरिक हा कचऱ्याचा त्रास सहन करीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधून काही होत असेल तर पहा, असे सांगत पोलीस बळाचा वापर केल्यास कारवाई करण्याचा इशारा कोर्टाने पालिकेला दिला आहे.

कचरा प्रश्नावर राहुल कुलकर्णी यांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. शहरातील कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, शहरात साथीचे रोग बळावले आहेत. मनपा प्रशासन आणि राज्य शासनाने शहरात साठलेला कचरा त्वरित उचलून त्याची घनकचरा व्यवस्थापन नियमानुसार विल्हेवाट लावावी, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. तर नारेगाव परिसरातील नागरिकांनी हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. यावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2018 7:05 pm

Web Title: in aurangabad the city was flooded with 4 5 million tons of garbage
Next Stories
1 औरंगाबादमध्ये कचराकुंडीला पहारेकरी; कुंडीत कचरा टाकल्यास ५०० रुपये दंड !
2 कौशल्य मिळाल्यानंतरही फक्त १७ जणांनाच नोकरी
3 औरंगाबाद महापालिकेची शहर स्वच्छतेची केवळ बॅनरबाजी
Just Now!
X