उदरनिर्वाहासाठी नशेच्या गोळ्यांची विक्री करण्यार्‍या पती-पत्नी विरुद्ध मुंकुदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणात अनिता माळवे (३०) हिला अटक करण्यात आली आहे तर पती अनिल माळवे फरार आहे.

अनिल हा प्रकाशनगर येथील घरातून नशेच्या गोळ्या विक्री करत होता. पोलिसांना ही माहिती दहा दिवसांपूर्वी मिळाली. आठ दिवसांपासून पोलिस अनिलवर पाळत ठेवून होते. गुरूवारी रात्री एक बनावट ग्राहक अनिलच्या घरी गोळ्या खरेदी करण्यासाठी पाठवला. खात्री होताच, घरावर छापा मारला.

सदर कारवाईत घरी गोळ्या सापडल्या. याची खरेदी किंमत अडीच हजार रुपये आहे. प्रत्येक गोळीची विक्री चढ्या दराने केली जाते. उदरनिर्वाहासाठी हा उद्योग करत असल्याचे आरोपी अनिताने पोलिसांना सांगितले. अनिल मात्र कारवाई होत असल्याचे पाहून घटनास्थळाहून पसार झाला.

अनिलकडून नशा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंकुदवाडी परिसरातील कामगार गोळ्या घेत होते तसेच्या त्या घराच्या परिसरात दोन शाळा देखील आहेत. तेथील काही विद्यार्थी देखील गोळ्या खरेदी करत असल्याची माहिती मिळाली आहे. या गोळ्या तो कुठून आणत होता हा तपास पोलिस करीत आहेत. सदरील कारवाई पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एस.पी. बनसोड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोरे, पी.सी. काकड, शेख असलम, चौधरी, सोनवणे यांनी केली.