30 September 2020

News Flash

संपामुळे एस. टी.चे ७० लाख उत्पन्न बुडाले

वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसाठी एस. टी. कामगारांच्या काँग्रेसप्रणित इंटक संघटनेने गुरुवारी संप सुरू केला होता.

एस. टी. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या दुसऱ्या दिवशीही प्रवाशांना मोठा फटका बसला. सलग दोन दिवसांपासून सुरू असलेला संप शुक्रवारी  सायंकाळी पाच वाजता मागे घेण्यात आला. मात्र, त्यापूर्वी परभणी विभागात एकही गाडी आगारातून बाहेर पडली नाही. त्यामुळे अंदाजे ३० ते ३५ लाख रुपयांच्या उत्पन्नावर विभागाला पाणी सोडावे लागले. संपामुळे प्रवाशांचे मात्र हाल झाले. परभणी विभागाचे दररोजचे उत्पन्न ४० लाख रुपये असून, दोन दिवसांपासून सुरू केलेल्या संपामुळे अंदाजे ७० लाखांपर्यंत उत्पन्न बुडाले.
वेतनवाढीच्या प्रमुख मागणीसाठी एस. टी. कामगारांच्या काँग्रेसप्रणित इंटक संघटनेने गुरुवारी संप सुरू केला होता. एस.टी.च्या चक्काजाम आंदोलनाने परभणी विभागात गुरुवारपासून ३८७ गाडय़ा जागेवरच थांबल्याने प्रवाशांची तारांबळ उडाली. ज्या गावात बसव्यतिरिक्त वाहन नाही, अशा गावातील प्रवाशांचे हाल झाले. गुरुवारी सकाळी नऊपर्यंत बस सोडण्याचा प्रयत्न परभणी व पाथरी आगाराने केला होता. परंतु तो आंदोलनकर्त्यांनी हाणून पाडला. त्यामुळे एकही बस न सोडण्याचा निर्णय आगार प्रशासनाने घेतला आणि त्यानंतर एकही बस सोडण्यात आली नाही.
संपाबाबत गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तोडगा निघाला नसल्याने हा संप सुरू ठेवण्याचा निर्णय इंटकने घेतला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी संप सुरू राहिला. दुपारी एकच्या दरम्यान नागपुरात इंटक संघटनेचे पदाधिकारी व परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत बठक होऊन तोडगा काढण्यात आला. परंतु संप मागे घेण्याबाबतची सूचना परभणी विभागाला सायंकाळी पाच वाजता मिळाली. तोपर्यंत एकही बस धावली नाही. संप सुटल्याची सूचना मिळताच सर्वच आगारातून पाचनंतर बस सोडण्यात आल्या. आजही परभणी बसस्थानकात बसची वाट पाहत बसलेले प्रवासी दिसून आले. संप सुटला असेल अशी अनेकांना अपेक्षा होती. त्यामुळे अनेक प्रवासी बसस्थानकात दुपापर्यंत बसून होते. दुपारनंतर मात्र बसस्थानक रिकामे झाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2015 2:51 am

Web Title: income loss of 70 lacks for parbhani depo
Next Stories
1 ८५ टक्के अधिकारी धुतल्या तांदळासारखे!
2 एस. टी. कामगारांच्या संपाचा मराठवाडय़ात प्रवाशांना फटका
3 शौचालयांची स्थिती दर्शविणाऱ्या कार्डावरून ठरणार घरांची ‘प्रतिष्ठा’!
Just Now!
X