जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडून प्रशासनाला सूचना

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यत करोनाकाळात आतापर्यंत तीन हजार ४९० जणांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेत १२४८ तर दुसऱ्या लाटेत २२००हून अधिक मृत्यू झाला. साथरोगाच्या काळात झालेल्या चुकांची दुरुस्ती करताना रुग्णवाहिकांमधील प्राणवायूची स्थिती, एका रुग्णालयाकडून दुसऱ्या ठिकाणी हलविताना बायबॅपचा उपयोग आदी कारणामुळे मृत्यू थांबवता येतात का, याची चाचपणी करुन मृत्यूदर रोखण्यावर भर द्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शुक्रवारी झाली.

कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम केल्याचा दावा जिल्हाधिकारी यांनी केला. चाचण्या वाढविण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

प्रतिजन चाचण्यांसाठी एक लाख आणि आरटीपीसीआर चाचणी संच उपलब्ध असून प्राणवायूचे २४  केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून वीज दाबाच्या काही समस्या असल्याने येत्या आठवडय़ाभरात हे केंद्र सुरू होतील असे ते म्हणाले. येत्या काळात मृत्यू दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना यंत्रणेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीस मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाणे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे, संगीता सानप, रिता मैत्रेवार, संगीता चव्हाण, मंदार वैद्य, मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा, डॉ. नीता पाडळकर, पर्यटन विभागाचे उपसंचालक श्रीमंत हारकर, डॉ. लड्डा, डॉ. विजयकुमार वाघ, अजोय चौधरी आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले,  जिल्ह्यत एक लाख ४३ हजार ५५० रूग्ण बरे झाले. सध्या जिल्ह्यत कोविड रुग्णांची संख्या कमी होते आहे. पण र्निबध शिथिल करण्याबाबत अद्याप कोणतेही आदेश आलेले नाहीत. राज्य सरकारचे लेखी आदेश येईपर्यंत दुपारी चार वाजेपर्यंत असणारे र्निबध कायम राहतील, असे चव्हाण म्हणाले.

डॉक्टरांना प्रशिक्षण

संभाव्य तिसऱ्या लाटेचा बालकांना धोका असल्याचे तज्ज्ञांचे मत असल्याने त्या दृष्टीनेही प्रशासनाने उपाययोजना केल्या असून अतिदक्षता विभागात व्हेंटीलेटरसह एकूण ६३१ खाटा  बालकांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. यामध्ये ४५ व्हेंटीलेटरचा समावेश आहे. या व्यतिरिक्त अजून २८ व्हेंटीलेटर सामाजिक दायीत्व निधीतून उपलब्ध झाले असून ३०० डॉक्टरांना लहान बालकांना उपचारासाठीचे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे.

लस उपलब्ध

जिल्ह्यत ५७ हजार लस उपलब्ध झाली असून दुसऱ्या मात्रेसाठी वाट पाहणाऱ्यांनी ती घ्यावी. शहरात १७ हजार तर ग्रामीण भागासाठी ४० हजार लस उपलब्ध करुन देण्यात आली असून लसीकरणालाही वेग देऊ असे ते म्हणाले.