औरंगाबाद जिल्ह्यातील करोना स्थिती काहीशी नियंत्रणात येत असल्याचे चित्र दिसत आहे.  दिवसभरात बाधित होणाऱ्यांचे प्रमाण दोनशेच्या आसपास असून रुग्ण बरे होण्याचा दर आता  ८६.५६ एवढा झाला आहे. औरंगाबादपेक्षा हिंगोली जिल्ह्यतील रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक म्हणजे ९०.८३ एवढा आहे. जालना आणि बीड या दोन जिल्ह्यतील हे प्रमाण ८० पर्यंत पोहोचणारे असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे गेले काही दिवस औरंगाबाद शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मृत्यूही कमी होत आहेत. शुक्रवारी दुपारी तीन जणांचा मृत्यू झाला. मात्र, या रुग्णालयात आतापर्यंत ७६५ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

काही दिवसापासून करोना चाचण्या कमी झाल्याने रुग्ण कमी दिसून येत असल्याची चर्चा होती. मात्र, शहरात आता आरटीपीसीआर चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. शहरातील एमआयटी मुलांचे वसतिगृह, ई. ओ. सी. पदमपुरा, समाजकल्याण मुलांचे वसतिगृह, एमजीएम क्रीडा संकुल व सिपेट चिकलठाणा या भागात ही केंद्रे सुरू असून ११ ठिकाणी सकाळी दहा ते सहा या वेळेत चाचणी केली जाणार आहे.

या शिवाय संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्याही सुरू असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, मराठवाडय़ात प्रतिदिन पाच ते सहा हजार चाचण्या सुरू आहेत. तुलनेने रुग्णसंख्या कमी होत असल्याचा दावा केला जात आहे. त्रास होणारी व्यक्ती चाचणीसाठी येतेच आहे. रुग्णशोधही सुरू असल्याचा दावा केला जात आहे.

तसेच येत्या काळात आणखी चाचण्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान येत्या काळात करोनाकाळातील आर्थिक नियोजनाची गरज सर्वत्र भासत आहे. या वर्षी जिल्हा आराखडय़ातून निधी देण्यात आला असला तरी पुढे निधी कसा उभा करायचा असे प्रश्न महापालिकेसमोर उभे आहेत. मात्र, संपर्कातील व्यक्तींचा शोध आणि त्यांचे विलगीकरण यातून यावर मात करता येते, असा हिंगोली प्रशासनाचा दावा आहे.

संपर्कातील व्यक्तींच्या शोधाचे प्रमाण एका व्यक्तीमागे २० ते २२ ठेवण्यात  बीड आणि हिंगोली जिल्ह्यला यश मिळाले आहे.  लातूर जिल्ह्यतही हे प्रमाण २०.४८ एवढे आहे.

मराठवाडय़ातील रुग्ण बरे होण्याचा दर

औरंगाबाद- ८६.९४

नांदेड-८१.०५

परभणी-८६.१४

लातूर-८५.३०

जालना-८०.३०

बीड-७९.७५

हिंगोली-९१.३१

उस्मानाबाद-८२.३३

करोनाची स्थिती आटोक्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहेत. बहुतांश खाटा आता रिकाम्या  राहू लागल्या आहेत. औषधे आणि ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत आहे. आता आरोग्य विभागातील रिक्त जागांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र गाफील राहता कामा नये.  रुग्णांना सेवा मिळेल अशी व्यवस्था केली जाईल.

– सुभाष देसाई, पालकमंत्री औरंगाबाद</p>