मराठवाडय़ातील करोनाबाधितांची संख्या आता वाढू लागली आहे. मुंबई आणि पुण्याहून आलेल्या रुग्णांमुळे बीड, परभणी जिल्ह्य़ांत विषाणू पोहोचला आहे. औरंगाबाद शहरातील करोनाबाधितांची संख्या एक हजाराहून अधिक झाली आहे. आतापर्यंत मराठवाडय़ात करोनाने ४० जणांचा मृत्यू झाला आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या औरंगाबाद शहरातील सर्व रुग्ण एकमेकांच्या संपर्कातील असल्याचे दिसून आले आहे. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रात महसूल अधिकारी आणि कर्मचारी  गस्त घालत आहेत. बाहेरून सीमा सील केल्या असल्या तरी आतमध्ये नागरिक संपर्क ठेवत असल्याने प्रशासनही हैराण आहे. टाळेबंदीमध्ये कॅरम आणि पत्ते याचे डाव रंगल्याने वस्त्यांमध्ये करोनाची बाधा अधिक वाढल्याचे सांगण्यात येत आहे.

नांदेड शहरातील गुरुद्वारा बोर्डातील सदस्यांना लागण झाली. ती पंजाबमधून परतलेल्या वाहनचालकामुळे आली की महाराष्ट्रातून विषाणू पंजाबमध्ये गेला यावरून वाद आहेत. मात्र गुरुद्वारामधील काही सदस्य चाचणी करून घेण्यासाठी तयार नव्हते. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबादहून नांदेड येथे जात हा प्रश्न सोडवला. आता नांदेडमध्ये १००हून अधिक रुग्ण आहेत. हिंगोलीमध्ये शंभराहून अधिक जवान मालेगाव आणि मुंबई येथे बंदोबस्तावरून परतले. त्यातील बहुतेकांना करोनाची लागण झाली. अशीच स्थिती औरंगाबादचीही होती. हजारांहून अधिक रुग्णांमध्ये ९३ राज्य राखीव दलातील होते. त्यांची प्रकृती चांगली असली तरी आकडा वाढत असल्याचेच दिसून येत आहे. या अनुषंगाने बोलताना  सुनील केंद्रेकर म्हणाले, ‘हा विषाणू पाय पसरतोय. पण अधिक चाचण्या केल्यामुळे अनेक लक्षणे न दिसणाऱ्या व्यक्तीही करोनाबाधित होत असल्याचे दिसून आले आहे. केवळ तो फुप्फुसावर आक्रमण करून थांबत नाही तर रक्ताच्या गुठळ्याही करत असल्याचे दिसून आले आहे.

औरंगाबाद शहरातील विषाणूचा प्रसार रोखताना झालेले मृत्यू लक्षात घेऊन खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात काम करणारे तज्ज्ञही आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात करोनाबाधितांची तपासणी करणार आहेत. मात्र एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात येणाऱ्या व्यक्तींमुळे बीड, परभणी या जिल्ह्य़ांमध्ये करोना आला आहे. बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी ५० दिवस टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केल्याने या जिल्ह्य़ात करोनाचा शिरकाव झाला नव्हता.

संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न

औरंगाबाद शहरातील करोना रुग्णांची व मृत्यूची संख्या लक्षात घेता वयोवृद्धांची तपासणी केली जाणार असल्याचे महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडेय यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील करोना रोखता न आल्याने तो ग्रामीण भागात पसरू नये म्हणून काय उपाययोजना केल्या जातात, याची विचारणा केली जात आहे. २० मे नंतर औरंगाबाद जिल्ह्य़ातील ग्रामीण भागातील व्यवहार अधिक जोमाने सुरू होतील. लातूर, नांदेड, उस्मानाबाद,  लातूर, जालना येथे मात्र व्यवहार सुरळीत करताना वेगवेगळ्या वेळी दुकाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.

मराठवाडय़ातील करोनाबाधितांची संख्या १ हजार २००हून अधिक झाली आहे. मात्र बरे होण्याचेही प्रमाण अधिक आहे. प्रशासनाकडून आता वयोवृद्धांची काळजी घेणारा चमू तयार केला जात आहे.

आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर

समस्येतून मार्ग काढण्यासाठी आरोग्य सुविधा वाढविण्यावर प्रशासनाने भर दिला. सध्या मराठवाडय़ातील रुग्णालयांमध्ये तीन हजार ८६४ खाटांची तयारी करण्यात आली आहे. व्हेंटिलेटर वाढविले आहेत. तसेच कडक टाळेबंदीमुळे या विषाणूचा प्रसार रोखण्यात काही प्रमाणात यश मिळत आहे. काही गल्ल्यांमधील प्रसार कमी झाल्याचे दिसून आले आहे.