शहरी भागातील करोना रुग्णसंख्या काहीशी स्थिरावत चालली असल्याचे दिसत असले तरी ग्रामीण भागात संसर्ग वाढत आहे. विशेषत: बीड जिल्ह्यात हे प्रमाण अधिक असून रुग्ण मृतावस्थेत येणे व त्याच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण ६० पेक्षा खाली असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रुग्णालयात आणल्यानंतर त्याच दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण मृत होण्याचे प्रमाण वाढत आहे. दुसरीकडे प्राणवायूची कमतरता आणि रेमडेसिविरची अनुपलब्धता या दोन्ही बाबी गंभीर बनत आहेत.

एखाद्या जिल्ह्याचा पुरवठा सुरळीत होतो, तर दुसऱ्या जिल्ह्याची तगमग वाढते. मराठवाड्यातील ग्रामीण भागात करोना संसर्गाचा वेग आता वाढू लागला आहे. ग्रामीण भागात पुरेशा प्रमाणात ऑक्सिमीटर नसल्याने प्राणवायू कमी होतो आहे काय, हे तपासण्यासाठी थेट रुग्णालयात जावे लागते. त्यामुळे संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये गंभीर परिणाम दिसून येत आहे. धाप लागणे, प्राणवायूचे प्रमाण झपाट्याने खाली येत असल्यामुळे अशा रुग्णांना प्राणवायू सुविधेच्या खाटांवर दाखल करून घेणे अपरिहार्य होत आहे. या अनुषंगाने बोलताना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता शिवाजी सुप्रे म्हणाले की, रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची स्थिती गंभीर आहे. बहुतांशी रुग्णांमध्ये ८० पासून ते ६० टक्क्यांपर्यंत प्राणवायूचे प्रमाण घसरलेले असते. दोन दिवसांपूर्वी तर केवळ २९ टक्के आणि ११ टक्के प्राणवायू असलेल्या रुग्णांनाही दाखल करावे लागले. त्यामुळे व्हेंटिलेटरची आवश्यकता अधिक भासू लागली आहे.

ग्रामीण भागात रुग्णवाढ

ल्ल रविवारी मराठवाड्यात ६ हजार ३९७ जणांना करोनाची लागण झाली. त्यातील चार हजार ८०७ रुग्ण ग्रामीण भागातले आहेत. आतापर्यंत मराठवाड्यात करोनामुळे आठ हजार ३२६ जणांचा मृत्यू झाला असून औरंगाबाद, नांदेड आणि लातूर जिल्ह््यांत मृत्यूंची संख्या अधिक आहे. रविवारी मराठवाड्यात १३२ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, शहरी भागातील रुग्णवाढ स्थिरावली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ८०.६७ टक्के एवढे असून औरंगाबाद जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५२ टक्के एवढे आहे. पण ग्रामीण भागात उशिराने मिळणारे चाचणी अहवाल आणि अंगावर दुखणे काढण्याची सवय यामुळे गंभीर रुग्ण वाढू लागले आहेत.

निर्बंधांमुळे अडवणूक

ल्ल औरंगाबादसह मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनच्या कुप्या मिळविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक प्रयत्न करत आहेत. खासगी रुग्णालय प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रण कक्षाकडे रेमडेसिविरची मागणी करावी असे अभिप्रेत आहे. प्रत्यक्षात रुग्णांची सर्व कागदपत्रे, रेमडेसिविरची आवश्यकता, रुग्णांचे आधारकार्ड आदी कागदपत्रे प्रशासनाकडे दिल्यानंतर औषधी विक्रेत्यांना त्यांच्या सहीशिक्क्यासह मागणी नोंदवावी लागते. अशी मागणी नोंदविण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात जातात, पण निर्बंधांमुळेही प्रत्येक चौका-चौकांत त्यांची अडवणूक होते. एवढा कागदी खेळ केल्यानंतरही इंजेक्शन मिळेलच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे गरजू व्यक्ती औषधी दुकानदार आणि त्याच्या पुरवठाधारकांचा पाठपुरावा करतात. त्यातून रेमडेसिविरचा काळाबाजार होत आहे. औरंगाबादमध्येही आता रेमडेसिविरचा तुटवडा जाणवू लागला आहे.

प्राणवायूच्या शुद्धतेसाठी अभियंते कामाला

ल्ल परळी येथील औष्णिक विद्याुत केंद्रातील प्राणवायूनिर्मितीचा प्रकल्प अंबाजोगाई येथे हलविण्यात आला. गेल्या दोन दिवसांपासून रुग्णांना देता येईल अशी शुद्धता आणण्यासाठी अभियंते प्रयत्न करीत आहेत. हवेतून प्राणवायू घेण्याच्या पद्धतीतून मिळणाऱ्या प्राणवायूची शुद्धता ८२ टक्के एवढी हाती लागली आहे. त्यात वाढ करून शुद्ध प्राणवायूनिर्मितीसाठी अभियंते प्रयत्न करत आहेत. या प्रकल्पामुळे साडेतीनशेहून अधिक ऑक्सिजनच्या मोठ्या टाक्या भरता येतील, असा अंदाज आहे.