News Flash

‘टँकरच्या निविदेत देवाण-घेवाणीमुळे अधिक दर’!

शहरात टँकर पुरविण्याच्या निविदेत दर कमी करण्याच्या बोलणीत ठेकेदाराला स्थायी समितीत देवाण-घेवाण करावी लागते. त्यामुळे अधिक दर लावल्याचे बुधवारी थेट आयुक्त सुनील केंद्रेकर यांनाच सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

शहरात टँकर पुरविण्याच्या निविदेत दर कमी करण्याच्या बोलणीत ठेकेदाराला स्थायी समितीत देवाण-घेवाण करावी लागते. त्यामुळे अधिक दर लावल्याचे बुधवारी थेट आयुक्त सुनील केंद्रेकर यांनाच सांगितले. कोणाला चहा पाजण्याचीही आवश्यकता नाही, दर कमी करावेत, अशी विनंती आयुक्तांनी केली खरी, पण देण्या-घेण्याच्या विषयात रक्कम लागणार नाही, अशी जबाबदारी तुम्ही घेतल्यास तेवढी रक्कम कमी करतो, असेच तो म्हणत राहिला. या प्रकारामुळे महापालिकेतील टक्केवारी पुन्हा चच्रेत आली आहे.
आयुक्त म्हणून केंद्रेकरांचा आज अखेरचा दिवस असला, तरी त्यांनी पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांची बठक घेतली. यानंतर निविदांच्या बोलणीसाठी ठेकेदारास महापालिकेत बोलावण्यात आले. शहरातील गल्लीबोळात टँकर जात नसल्याने ५ हजार लिटर क्षमतेच्या २२ टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. सातारा देवळाईसाठी हे टँकर लावले जाणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामीण भागात ज्या दरात पाणीपुरवठा करण्याचे ठरविले आहे, तोच दर शहरातही अमलात आणावा, अशी सूचना केंद्रेकरांनी केली. तोच ठेकेदार महापालिकेला उपलब्ध होऊ शकतो का, याची चाचपणी करण्यात आली. मात्र, तो उपलब्ध होत नसल्याने अन्य ठेकेदारास हे काम देण्याचे ठरविण्यात आले. कमी दर भरणाऱ्या ठेकेदाराने दरात आणखी कपात करावी, या साठी आयुक्तांशी चर्चा करण्यासाठी त्यास बोलविण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयास १२ हजार लिटर क्षमतेच्या टँकरसाठी प्रतिदिन प्रतिटन १४८ रुपये व प्रतिकिलोमीटर १.८० असे दर ठरविण्यात आले. शहरातील ठेकेदारास ५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने पाणीपुरवठय़ासाठी २०० रुपये प्रतिटन व प्रतिकिलोमीटर दोन रुपये असे दर भरले होते.
भरलेल्या दरापेक्षा काही रक्कम कमी करावी, अशी विनंती आयुक्तांनी केली आणि तो ठेकेदार म्हणाला, साहेब, स्थायी समितीचे ‘विषय’ असतात. ते काही घेणार नाहीत, अशी जबाबदारी तुम्ही घेणार असाल तर काही रक्कम कमी करता येईल. शेवटी कोणाला काही देण्याची गरज नाही. अगदी कोणाला चहासुद्धा पाजू नका, पण दर कमी करावेत, अशी विनंती करण्यात आली. अनेकदा सांगूनही तो ठेकेदार विषय समितीच्या देवाण-घेवाणीविषयी थेट बोलत राहिल्याने ही चर्चा पुढे सरकू शकली नाही. शहर अभियंता सखाराम पानझडे, सिकंदर अली आदी अधिकारी या चच्रेदरम्यान आयुक्त कार्यालयात हजर होते. मात्र, स्थायीची देवाण-घेवाण आणि ठेकेदारांनी त्यावर व्यक्त केलेले थेट मत यामुळे महापालिकेतील अर्थव्यवहार पुन्हा चच्रेत आले आहेत. ही निविदा निघण्यापूर्वी औरंगाबाद शहरात ५ हजार लिटर क्षमतेच्या टँकरने होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचा दर १ हजार ५३० रुपये होता. सध्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठरविलेला दर यापेक्षा निम्माच म्हणजे ७५० रुपये एवढाच आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2016 1:40 am

Web Title: increase rate in tanker tender
टॅग : Tanker
Next Stories
1 सोलापूर-तुळजापूर-जळगाव रेल्वेमार्ग निराशेच्या रुळावर!
2 परळी-बीड-नगर रेल्वेमार्गाची यंदाही २०० कोटींवर बोळवण
3 मराठवाडय़ातील जमीन खरेदी-विक्री, सदनिकांच्या व्यवहारात ३० टक्के घट
Just Now!
X