सुहास सरदेशमुख

ऑनलाइन विक्री आणि मागणीमध्ये घट नसतानाही मद्यविक्री आणि त्यातून मिळणाऱ्या महसुलामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ११९९ कोटी ६३ लाख रुपयांची घट आली आहे. जुलै आणि ऑगस्टमधील उत्पादन शुल्क प्रत्येकी २२२ कोटी ८३ आणि २६७ कोटी ७ लाख रुपये उत्पादन मिळाले खरे, पण गेल्या वर्षी याच दोन महिन्यांतील तुलनेत उत्पादन उणे ३१ आणि उणे २७ टक्के असल्याचे दिसून आले आहे.

टाळेबंदीनंतर सर्वाधिक मागणी होती ती मद्याला. अगदी ऑनलाइन विक्रीला परवानगी दिल्यानंतर गावोगावी मद्य खरेदीसाठी रांगा लागल्या. ऑनलाइन नोंदणी करायची आणि रांगेत उभे राहायचे असे प्रकारही घडले. कारण नोंदविलेल्या पत्त्यावर ‘पार्सल’ आलेच तर कोंडी होण्याची शक्यता अधिक होती. ग्रामीण आणि शहरी भागांतील टाळेबंदीमुळे विक्रीवर मोठे परिणाम झाले. औरंगाबादहून विविध राज्यांत मद्यविक्री केली जाते. औरंगाबाद शहरात युनायटेड स्पिरिट, कोकण अ‍ॅॅग्रो, एबीडी, रॅडिको एन. व्ही. ग्रनॉच इंड या कंपन्या विदेशी मद्य बनवतात. गेल्या वर्षी म्हणजे २०१८-१९ मध्ये ३०९ कोटी ७२ लाख लिटर उत्पादन झाले होते.

टाळेबंदीच्या काळात उत्पादन थांबले. मात्र गेल्या तीन महिन्यांतील उत्पादनाला काहीसा वेग मिळाला असला तरी उत्पादनाचे आकडे १९३ कोटी ७२ लाख लिटपर्यंत पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेतील ही घट ३७.४२ टक्के असल्याची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागात आहे.

विदेशी मद्यनिर्मिती कंपन्यांबरोबरच पाच कंपन्या बीअर बनवितात. यू. बी मिलिनियम, यू. बी. अजिंठा, काल्सबर्ग, ए.बी.इन, लिलासन्स या कंपन्यांमध्ये बीअर तयार होते. टाळेबंदीमुळे उत्पादनाचे घसरलेले प्रमाण ६८ टक्के कमी झाले. त्याचा परिणाम महसूल कमी होण्यात झाला. गेल्या पाच महिन्यांतील औरंगाबाद जिल्ह्य़ाचा महसूल ७१८ कोटी ७ लाख रुपये झाला आहे.

गेल्या तीन महिन्यांत विक्रीत वाढ

टाळेबंदीमुळे एप्रिल महिन्यात उत्पादन सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर नऊ कोटी १३ लाख रुपयांचा महसूल मिळाला. मे महिन्यात त्यात मोठी वाढ दिसून आली तो ७० कोटी ३९ लाख रुपये, जूनमध्ये १९४ कोटी, जुलैमध्ये २२२ कोटी ८३ लाख आणि ऑगस्टमध्ये २६७ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गेल्या वर्षी ३०३ लाख लिटर मद्यविक्री होती या वर्षी १९५.१५ लाख लिटर मद्यविक्री झाली.  मात्र टाळेबंदीमध्ये मागणी असणाऱ्या उत्पादनातील महसुली घट अर्थचक्राला गाळात ढकलणारी असल्याचे मानले जात आहे.

गेल्या तीन महिन्यांत विक्री वाढली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत मिळणारे महसूल कमी आहे. पुढील काळात ते वाढू शकेल. कोविड काळातील विक्रीबंदीमुळे अडचणी वाढल्या होत्या. ऑनलाइन विक्रीनंतर आता दुकाने सुरू झाली आहेत, पण अजूनही बार सुरू झालेले नाहीत.

– सुधाकर कदम, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क

मद्यप्राशनाचे प्रमाण तसे वाढले असे म्हणता येणार नाही. मात्र बाहेर जाऊन संसर्ग घरात आणण्यापेक्षा व्यसनाधीन व्यक्तींना घरातही मद्यप्राशन करायला परवानगी मिळाली आहे. पण त्यामुळे घरातील वाद वाढताहेत. तशा तक्रारी आल्या. तसेच ज्यांना सवय होती आणि करोना संसर्ग झाला त्यांच्यामध्ये भीतीचे आणि चिंता वाढल्याचेही दिसून आले.

– डॉ. संदीप शिसोदे, मानसोपचारतज्ज्ञ