सुहास सरदेशमुख

तशी कोणतीही चिंता नाही पण अलीकडे झोप काही येत नाही, अशा आशयाचे दूरध्वनी समुदपदेशानासाठी येत आहेत. राज्यातील विविध भागात राहणारी मंडळींकडून येणारे हे दूरध्वनी करोना विषाणू आणि त्यानंतरच्या टाळेबंदीचे परिणाम असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी व्यक्त केले. स्वत:ची घरकोंडी करून घेतल्यानंतर गेल्या दोन महिन्यात लोक जेव्हा बाहेर पडत तेव्हा त्यांना निर्मनुष्य रस्ते दिसत. चौकाचौकात पोलीस उभे ठाकलेले असत. त्या वेळी ते दृश्य जरी आघात करणारे वाटत नसले तरी त्याचे परिणाम आता जाणवू लागत असल्याचे विश्लेषण मानसोपचार तज्ज्ञ करत आहेत.

बेरात्री ‘वॉटस् अ‍ॅप’वर संदेश पाठविणाऱ्याचे प्रमाण वाढले असून टाळेबंदीनंतर समूह मानसिकता बदलली. भीती ही भावना मेंदूमध्ये प्राधान्याने पुढे येते. त्यामुळे काळजी घेऊ आणि बाहेर पडू असे बजावून सांगितल्यानंतरही निष्काळजीपणा तर झाला नाही ना, यामुळेही निद्रानाश हा विकार जडू लागला आहे. रिझव्‍‌र्ह बँकेत मोठय़ा हुद्दय़ावर असणाऱ्या व्यक्तीने दूरध्वनी करून झोप येत नसल्याची तक्रार केली. अशीच अवस्था बेस्टमधील अधिकाऱ्याचीही असल्याचा अनुभव डॉ. शिसोदे यांच्याकडे व्यक्त करण्यात आला. गेल्या दोन महिन्यामध्ये करोना विषाणूबरोबरच भीतीची भावनाही बळावली आहे. काही महिन्यापूर्वी विषाणूमुळे  काळजी वाढली. पुढे ती जागा भीतीने घेतली. जगावे कसे या भीतीची चिंता वाढत गेली. आता चिंता जुनाट झाली आहे. त्या विरोधातील बंड म्हणून सारे जण आता करोना जणू नाहीच, असे म्हणून पळू लागले आहेत. आता भीती विरोधातील आक्रमकता म्हणून समूह वर्तनाकडे पाहावे लागेल, असेही डॉ. शिसोदे सांगतात. मनावर काही दृश्य परिणाम होत असतात. साप स्वप्नातही दिसतात आणि प्रत्यक्षातही. परिणाम वेगवेगळे असतात. तसेच या अदृष्य विषाणूचेही मानसिक परिणाम दिसू लागले आहेत. त्याचे लक्षण म्हणून निद्रानाशाच्या तक्रारी वाढल्या आहेत. ज्या मंडळींचे हातावरचे पोट आहे त्याची भीती ही विषाणू नसून भूक असू शकते. त्यामुळे त्यांचे वर्तन बेदरकार वाटू शकते. भीतीचा भाग चिंतेमध्ये झाल्याने निद्रानाशाचे विकार जडू लागले आहेत. या आठवडय़ाभरात झोप येत नसल्याच्या दूरध्वनींची संख्या दररोज पाच- सात एवढी आहे.

‘वाढलेली गर्दी म्हणजे भीती विरुद्धचे बंड’

प्रत्येकाच्या मनात भीती आहे. मात्र, त्यावर मात करण्यासाठी बंड म्हणून लोक बाहेर पडू लागले आहेत. ज्यांना दररोजच्या जगण्याची भ्रांत नाही अशा व्यक्तींची गर्दी हे त्याचेच लक्षण आहे. त्याला इतरही काही कंगोरे आहेत. मात्र, भीतीवर मात करण्यासाठी चुकीच्या पद्धतीने वागणे बरोबर नाही, असे आवाहन केले जात आहे. औरंगाबाद शहरातील अनेक भागात मुखपट्टी बांधली जात नाही. नाकाला उघडे ठेवून हनुवटीला पट्टी बांधणारे अनेकजण आहेत. अशाने हा रोग अधिक पसरेल, असा इशारा डॉक्टर देत आहेत. मात्र,  मानसिकदृष्टय़ा सक्षम राहण्यासाठी व्यक्त होणे हा पर्याय आहे. झोप पूर्ण होत नसेल तर त्याचे परिणाम रक्कदाब वाढण्यावर होऊ शकतो.

असे काही पर्याय..

* व्यक्त होणे हा एक पर्याय

* ज्या गोष्टी आपल्या हातात आहेत तेवढय़ाच गोष्टीचा विचार करा

* भावनिक व्यवस्थापनासाठी वास्तव स्वीकारण्याची गरज