News Flash

विकासासाठी स्वतंत्र मराठवाडा राज्य आवश्यकच!

डॉ. चितळे म्हणाले, ‘सरंजामी राजवटीचा या भागाच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झालेला आहे.

डॉ. माधवराव चितळे यांची अपेक्षा

संयुक्त महाराष्ट्र निर्मिती हा भाषेचा बंध होता. त्या एकमेव आधारावर विकास संकल्पना रुजणार नाही. मराठवाडय़ाचा विकास करायचा असेल तर स्वतंत्र राज्य हेच समस्या समाधान असेल, असे नि:संदिग्ध प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. अलीकडेच चितळे यांना गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या निमित्ताने त्यांनी ‘मराठवाडय़ाच्या विकासाच्या भविष्यकालीन दिशा’ या विषयावर मांडणी केली होती. त्या मांडणीचे व्यवस्थात्मक प्रारूप जाणून घेण्यासाठी त्यांची भेट घेतली असता डॉ. चितळे यांनी स्वतंत्र मराठवाडा राज्याची संकल्पना विस्ताराने मांडली.

डॉ. चितळे म्हणाले, ‘सरंजामी राजवटीचा या भागाच्या मानसिकतेवर मोठा परिणाम झालेला आहे. या भागातून नेहमी ज्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम आहे, असेच नेते निवडून येतात. शेजारच्या तामिळनाडू भागात तसे होत नाही. जे नेते निवडून येतात ते जेव्हा मुंबईत जाऊन नेतृत्व करतात तेव्हा त्यांची मानसिकताही तशीच शहरी झाल्याचेच अनुभव आहेत. विकास साधायचा असेल तर त्या भागाच्या भौगोलिक विविधतेचा विचार होताना दिसत नाही. उदा. दुग्धविकास! मराठवाडा हा दुग्धविकासाचा उत्तम भूभाग आहे. कुंथल म्हणजे कुरळ्या केसाच्या प्रदेशात गवत लागवड आणि त्यावर पशुपालन हे जीवनमान उंचावण्याचे साधन असायला हवे होते, पण तसे घडले नाही. औरंगाबाद शेजारच्या नगर जिल्हय़ात बाळासाहेब थोरात यांनी ते काम उत्तम केले. पश्चिम महाराष्ट्रात विनय कोरे हे दूध विकासाचे काम पुढे नेत आहेत. मराठवाडय़ात हे काम उभे करण्याची गरज आहे, पण तसे नेतृत्व उभे राहिले नाही. कारण प्रादेशिकतेचा विचार करून विकासाची नवी मांडणी करण्याची आवश्यकता आहे. तसे करायचे झाल्यास मुंबई, पुणे, नाशिकच्या नेतृत्वाची मानसिकता मराठवाडय़ाला उपयोगी पडणार नाही. नेतृत्वाचे अनुभव क्षेत्र निराळे असल्याने कृत्रिमरीत्या आपण सारे एका कायद्याने बांधले गेलेले असतो. सिंचनाचे कायदे व नियम करताना ही बाब स्पष्टपणे जाणवत होती. पण केवळ एक भाषा एक प्रांत असे म्हणून प्रादेशिक भौगोलिक स्थितीचा विचार करता केले जाणारे विकासाचे नियोजन चुकीचे ठरेल, असे सांगत डॉ. चितळे यांनी मराठवाडय़ाचा विकास करायचा असेल तर हा भूभाग स्वतंत्र राज्य म्हणून पुढे यायला हवा.’

स्वतंत्र मराठवाडा आर्थिकदृष्टय़ा सक्षम कसा असेल, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, मराठवाडय़ातील बँकांमध्ये ठेवली जाणारी अनामत रक्कम आणि मुंबई-पुणे यांसह राज्यातील इतर शहरांमधील पैसा याचा अभ्यास करावा. लक्षात असे येईल, की मराठवाडय़ातील लोक काटकसरी आहेत.

त्यांनी जमा केलेली रक्कम बऱ्याचदा शहरी भागात जात आहे. पुणे, नाशिक आणि अगदी मुंबईमध्येही या भागातून जाणाराच पैसा आहे.

शिक्षणासाठी या भागातून जाणाऱ्यांची संख्या आणि त्यांचा खर्च होणार पैसा याचा ताळमेळ घालून अभ्यास करायला हवा. पण या पुढे मराठवाडय़ाच्या विकासासाठी ते राज्य स्वतंत्र व्हावे, अशीच मानसिकता निर्माण होण्याची गरज आहे.

चीनमध्ये अभ्यास करणाऱ्यांचे अनेक गट निर्माण झालेले आहेत. तसे गट निर्माण करण्याची प्रक्रिया आपल्याकडेही हाती घेतली तर विकासाच्या नव्या मांडणीला ते पूरक ठरू शकेल, असेही ते मुलाखतीदरम्यान म्हणाले.

औद्योगिक विकासाशिवाय कोणत्याही भागाचा विकास शक्य नसतो. त्यासाठी आवश्यक असते ती वाहतूक व्यवस्था. मराठवाडय़ातील रेल्वे वाहतूक ही व्यवस्था अत्यंत कमकुवत आहे. ती सुधारण्यासाठी तातडीने तसा दबावगट निर्माण करणाऱ्या चळवळी सक्षम करणे आवश्यक असल्याचेही चितळे यांनी सांगितले.

राज्याच्या क्रमिक पुस्तिकांमध्येही मुंबई, पुणे शहराचा पगडा जाणवतो. खरेतर या भागातील अनुभवक्षेत्रांचा समावेश अभ्यासक्रमांमध्ये पुरेसा नाही. असे अनेक विकासक्षेत्रांच्या बाबतीत आहे. त्यामुळे त्यावर मात करायची असेल तर स्वतंत्र मराठवाडा राज्य असावा, असा विचार करण्याची गरज आहे.

डॉ. माधवराव चितळे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 1:37 am

Web Title: independent marathwada state is needed for development says dr madhavrao chitale
Next Stories
1 एक चहाचा कप रेशीमबंध जुळवणारा..!
2 अधिवेशनाच्यावेळी शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलत नाही: धनंजय मुंडे
3 शांततेत.. कार्यालय सुरू आहे!
Just Now!
X