शीख समाजाचे दहावे गुरू श्री गुरुगोविंदसिंघजी यांच्या नावाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वतंत्र अध्यासन स्थापन करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा फसवी ठरली आहे. या विषयात कागदी घोडे नाचविण्याखेरीज ठोस कृती झाली नसल्याचे दिसून आले.
पंजाबमधील घुमान येथे गेल्या एप्रिल महिन्यात पार पडलेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वरील घोषणा करून उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या होत्या; पण या घोषणेला आठ महिने लोटले, तरी विद्यापीठात अध्यासन सुरू झाले नाही, असे सांगण्यात आले. या प्रकरणी विद्यापीठ प्रशासनाने सर्व जबाबदारी सरकारवर ढकलली, तर स्थानिक गुरुद्वारा मंडळाचे अध्यक्ष ता. तारासिंघ यांनी या विषयात विद्यापीठाला दोषी धरले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर गुरुवारी नांदेडमध्ये नव्हते. त्यामुळे अध्यासनाची स्थापना नेमकी कशात अडकली ते कळले नाही; पण मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर विद्यापीठाने अध्यासनासंदर्भात राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता, असे सांगण्यात आले.
दरम्यान, स्थानिक गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष ता. तारासिंघ यांनी विद्यापीठात गुरुगोविंदसिंघजी अध्यासन सुरू न होण्यास विद्यापीठाची उदासिनता कारणीभूत असल्याचा ठपका विद्यापीठ प्रशासनावर ठेवला. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर गुरुद्वारा बोर्डाचे प्रतिनिधी कुलगुरूंना भेटले होते. अध्यासन स्थापन करण्यास आवश्यक ती मदत करण्याची तयारी आम्ही दर्शविली होती. परंतु नंतर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, असे ते म्हणाले.
‘बादल यांची घोषणा फसवी’
दरम्यान, घुमान साहित्य संमेलनातच पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंघ बादल यांनी, अमृतसरच्या श्री गुरुनानक देवजी विद्यापीठात संत नामदेव यांच्या नावे अध्यासन कें द्र सुरू करण्याची घोषणा केली खरी; परंतु या बाबतचा फोलपणाही उघड झाला असून याच विद्यापीठात हे अध्यासन केंद्र तब्बल १८ वर्षांपूर्वीच म्हणजे १९९७मध्ये सुरू करण्यात आले होते. दहा वर्षे हे केंद्र व्यवस्थित चालले आणि २००७पासून निधीअभावी बंद पडल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.
या अध्यासन केंद्राच्या पहिल्या प्रमुख म्हणून डॉ. इकबालकौर सौंध यांनी काम पाहिले. २००६-०७मध्ये डॉ. धरमसिंघ यांनी काम पाहिले. त्यानंतर मात्र हे अध्यासन केंद्र निधीअभावी बंद पडले. पंजाबचे मुख्यमंत्री बादल यांना या बाबत नेमकी माहिती कशी नसावी, या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. उलट त्यांनी हे बंद पडलेले अध्यासन केंद्र निधी देऊन जोमाने सुरू करू, असे आश्वासन देऊन प्रत्यक्ष कृती करायला हवी होती, असे सांगितले जात आहे.
‘अर्थमंत्र्यांनी लक्ष द्यावे’
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार उद्या (शुक्रवारी) नांदेड दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी जिल्ह्य़ाचे संपर्कमंत्री या नात्याने विद्यापीठात श्री गोविंदसिंघजी अध्यासन केंद्र सुरू करण्यास पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासनाने मुनगंटीवार यांची भेट घ्यावी, असेही सुचविण्यात आले.