लातूर, उस्मानाबाद व बीड जिल्हय़ातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या ३२५ मुला-मुलींच्या निवास, शिक्षण, भोजन याची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने स्वीकारली आहे. त्यासाठी शासकीय अनुदान न घेता पूर्णपणे संघटनेच्या वतीने सर्व खर्च केला जाणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथ्था यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुथ्था म्हणाले, १९९३ च्या भूकंपानंतर भूकंपग्रस्त भागातील १ हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेने उचलली होती. ती उत्तमपणे पार पाडली. त्या मुलांचे पदव्युत्तपर्यंतचे शिक्षणही केले. त्यातील ३०० पेक्षा अधिक मुले शासकीय सेवेत काम करत आहेत. १९९७ च्या जबलपूर भूकंपानंतर व २००५च्या जम्मूच्या भूकंपानंतर तेथील मुलांनाही पुण्यात संगोपनासाठी आणले. गुजरातच्या भूकंपाची आपत्ती मोठी होती तेव्हा ३६८ शाळा बांधून १ लाख २० हजार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली. सध्या राज्यात दुष्काळाची भीषण स्थिती आहे. यापूर्वी जनावरांच्या छावण्या उभारणे, गाळ काढणे असे उपक्रम राबविले. बीड, लातूर व उस्मानाबाद या जिल्हय़ात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण मोठे आहे. या दहा महिन्यांत ४२२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात १९३ मुले व १३२ मुली असे ३२५ विद्यार्थी आहेत. पकी २१३ मुला-मुलींच्या परिवाराने सर्वेक्षण सुरू असतानाच पुण्याला जाण्याची संमती दिली आहे.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांपकी १८ ते २४ वयोगटातील संख्या ७ टक्के, २५ ते ३४ वयोगटातील २० टक्के तर ३५ ते ४४ वयोगटातील संख्या २५ टक्के आहे. ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ७४ टक्के शेतकऱ्यांकडे कोरडवाहू जमीन आहे. ७ टक्के शेतकऱ्यांची जमीन पडीक आहे. ५ टक्के भूमिहीन आहेत तर केवळ २ टक्के शेतकऱ्यांकडे बागायती जमीन आहे. ७६ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांपकी ४७ टक्क्य़ांकडे केवळ १ लाखांचे कर्ज होते. आत्महत्याग्रस्त ४२२ घरांमध्ये १८ वयोगटाच्या पुढचे १ हजार ७३ लोक आहेत. त्यापकी २०६ लोकांची जिल्हा सोडून बाहेर नोकरीला जाण्याची तयारी आहे. त्यात १३० पुरुष व ७६ महिला आहेत. अशा मंडळींना नोकरी देण्याचे प्रयत्नही भारतीय जैन संघटनेमार्फत केले जाणार आहेत.
लातूर, उस्मानाबाद व बीड या तीन जिल्हय़ांत २० नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभाचे कार्यक्रम केले जाणार असून २० तारखेला सर्व जण नगरमध्ये मुक्कामी थांबणार आहेत. २१ नोव्हेंबर रोजी सर्व विद्यार्थ्यांना पुणे येथील वाघोली प्रकल्पात नेले जाणार आहे. २१ नोव्हेंबर हा योगायोगाने जागतिक आत्महत्या आधारदिन आहे. या दिवसाला युनोने मान्यता दिली आहे. आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांच्या पुढच्या पिढीचे भवितव्य घडवण्याचा छोटासा प्रयत्न भारतीय जैन संघटनेच्या वतीने केला जात असल्याचे मुथ्था म्हणाले.