सुहास सरदेशमुख

टोमॅटो, कांदा, लसूण, आलेयांसह विविध पदार्थ सौरशक्तीवर वाळवून ते पदार्थ देशभरात विक्री करणारी ‘एस फॉर एस’ ही १४ कोटी रुपयांच्या उलाढालीची कंपनी पुढील तीन वर्षांत खरेदी करण्याचा करार औरंगाबाद जिल्ह्यतील महिला शेतकरी उत्पादक कंपनीने केला आहे. ‘वूई फॉर एम्पॉवरमेंट’या महिला शेतकरी कंपनी बरोबर तसा करार गुरुवारी करण्यात आला. हा करार होताना राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बॅंकेचे डॉ. जी. आर. चिंतला यांचीही उपस्थिती होती. सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या वतीने बनविण्यात आलेल्या पाच शेतकरी उत्पादक कंपन्यांमधील ‘वूई फॉर एम्पॉवरमेंट’ ही कंपनी असून यामधील संचालक मंडळाचे शिक्षण दहावी आणि त्यापेक्षाही कमी आहे. सौरयंत्रापासून भाजी वाळविण्याचे यंत्र बनविल्यानंतर फुलंब्री तालुक्यातील काही गावातून त्याचा उपयोग केला जात होता. त्याचे फायद्यातील अर्थशास्त्र महिलांना उपयोग पडावे म्हणून सामाजिक जाणिवेतून १५ कोटी रुपयांची उलाढाल असणारी ही कंपनी चालविण्यास घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाने तसेच तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘एस फॉर एस’ कंपनीकडून कंपनीची मालकी महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे.

महिला शेतकऱ्यांची स्वतंत्र कंपनी स्थापन करणे आणि त्यांनी स्वत: एक कंपनी विकत घेणे या अनुषंगाने झालेला प्रवास वर्णन करताना सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या डॉ. प्रतिभा फाटक म्हणाल्या,‘ ग्रामीण भागात महिलांच्या जेवणात भाज्यांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून आले होते. फेब्रुवारी ते जून या कालावधीमध्ये ग्रामीण भागात डाळ ,फार तर फार दूध असे पदार्थ असतात. याचा त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत असे. या वर उत्तर म्हणून भाज्या वाळवून खाण्यावरचा उपाय काढण्यात आला. त्याला ‘सायन्स फॉर सोल्युशन ’ या संस्थेच्या तरुण तंत्रज्ञांनी नवे परिमाण दिले. सौर वाळवण यंत्र (सोलार ड्रायर) विकसित करण्यात आले आणि त्यानंतर महिलांच्या आरोग्यात मोठे फरक दिसून आले. फुलंब्री तालुक्यातील चौका, मोरबीडा, खामखेडा, डोणगाव, बोरवाडी, हातमाळी, नायगव्हाण, अंजनडोह या गावातील महिलांना सौर वाळवण यंत्र देण्यात आले. गावोगावी ऊर्जामित्र निर्माण करुन टोमॅटो, कांदा, लसूण, आद्रक , हळद हे पदार्थ कापून त्याचे तुकडे करणे आणि वाळविणे याची यंत्रे देण्यात आली. उन्हाळयातही प्रतिवर्षी एका महिलेस एक ते दीड लाख रुपयांचा लाभ केवळ वाळविण्याच्या उपक्रमातून मिळविण्यात आला. त्यामुळे महिलांमध्ये कंपनी चालविण्याचा आत्मविश्वास निर्माण होत गेला. नव्याने स्थापन केलेल्या दहा महिलांच्या कंपनीने आता अर्थशास्त्र, व्यवस्थापन, बाजारपेठ याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली आहे. पुढील तीन वर्षांत सौर शक्ती वापरुन भाजी वाळवून त्याची विक्री करणाऱ्या कंपनीच्या या दहा महिला मालकीण होतील असा करार करण्यात आला आहे.’ दहा गावातील या महिलांच्या कंपनीच्या अध्यक्षा म्हणून सध्या संगीता वाघ या काम पाहत असून सुनीता मुंडे, वर्षां शेजुळ, कमळ शेजूळ, प्रभावती पडुळ, शकुंतला घाईट या कंपनीच्या संचालक आहेत.

असा हा नवा प्रयोग

अनेकदा भाज्यांना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे भाज्या वाया जातात. रस्त्यावर टाकून देण्याइतपत वेळ येते. त्याऐवजी कांदा, लसूण, गाजर, भेंडी, टोमॅटो वाळवून त्यांची विक्री करण्याचे तंत्र विकसित व्हावे असे प्रयत्न झाले होते. वैभव तिडके नावाच्या तरुणाने सौरशक्तीच्या आधारे वाळवण यंत्र विकसित केले. त्याच्या समवेत गणेश बिरे, अश्वीन पावडे, तुषार गवारे, निधी पंत, शीतल सोमानी ही मंडळी काम करत होती. मुंबई, पुणे यासह देशातील विविध शहरात वाळलेल्या भाज्या विक्रीचे तंत्र विकसित करणारी ही मंडळी गावातील महिलांना उत्थानासाठी शेंद्रा येथे अन्न प्रक्रियेवरचा उद्योग चालवत होते. आता हा प्रकल्प महिलांच्या मालकीचा व्हावा  असा करार करण्यात आला आहे.

‘वेगवेगळया राज्यात सौर वाळवण यंत्रासह अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये ‘एस फॉर एस’ ही कंपनी काम करते. आता पुणे, जळगाव या महाराष्ट्रातील जिल्हांसह ओडिसा, कोईम्बतूर येथे विस्तार होत आहे. त्यामुळे लागणारा कच्चा माल आणि ठिकाणे याचा विचार करता पदार्थ निर्मिती प्रक्रियेच्या क्षेत्रात काही अन्य कंपन्यांनी उतरावे असे वाटत होते. शेतकरीा कंपन्यांनी यात पुढाकार घ्यावा अशी संरचना मात्र पहिल्यांदा विकसित होत आहे. या कंपन्यांनी तयार केलेल्या मालाच्या विपणनाची जबाबदारी ‘एस फॉर एस’ या कंपनीकडेच आहे. महिलांना पायावर उभे करणारी ही संचरना उभी राहू शकेल.’

– अश्वीन पावडे, संचालक ‘एस फॉर एस’