29 October 2020

News Flash

औरंगाबाद जिल्ह्य़ात संसर्ग रोखण्याची मोहीम

सर्वाधिक मृत्यू साठीच्या पुढच्या व्यक्तींचे; सर्वेक्षण पुन्हा ऐरणीवर

(संग्रहित छायाचित्र)

औरंगाबाद जिल्ह्य़ात करोनामुळे ८९५ जणांचा मृत्यू झाला असून मृत्यू झालेल्या १९७ जणांचा केवळ एक दिवस, ८१ जणांचा दोन दिवस तर ७४ जणांचा मृत्यू तीन दिवसाच्या उपचारानंतर झाला होता. याचा अर्थ अंगावर दुखणे काढण्याचा प्रकार अधिक दिसून आला आहे. करोना मृत्यू झालेल्या व्यक्तींचे विश्लेषण केले असता ५८६ जणांना कोविड संसर्गाबरोबरच अन्य आजार होते. तर सर्वाधिक ५२५ व्यक्तींचे मूत्यसमयीचे वय साठी ओलांडलेले होते. त्यामुळे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम अधिक सजगपणे केली जात आहे. खरे तर या सर्वेक्षणापूर्वी माझे आरोग्य माझी जबाबदारी या सर्वेक्षणातही वयोवृद्ध व्यक्तींची आकडेवारी महापालिकेकडे होती. पण शासनाने घेतलेल्या निर्णयाने पुन्हा एकदा सर्वेक्षण मोहीम अधिक जोरकसपणे केली जात आहे.

औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ८९५ जणांचा मृत्यू झाला असून त्यातील ६५१ मृत्यू महापालिका क्षेत्रातील आहेत तर २४४ मृत्यू ग्रामीण भागातील आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींपैकी ५९२ पुरुष आणि ३०० महिलांचा समावेश असून तीन वर्षांच्या दोन मुलांचाही यामध्ये समावेश आहे. मार्च महिन्यात औरंगाबादमध्ये करोना विषाणू संसर्गाचा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर एप्रिलपासून करोनाबाधितांचे मृत्यू होण्याची प्रक्रिया सुरू आहे. जुलैमध्ये सर्वाधिक २१७ जणांचा मृत्यू झाला. आता औषधे देण्याच्या पद्धतीमध्ये गेल्या पाच महिन्यात बरेच बदल झाले असून सप्टेंबरमधील मृत्यूचा आकडा आता १८३ वर पोहचला आहे. जर मृत्यूवर नियंत्रण ठेवायचे असेल तर रुग्णांवर लवकर उपचार सुरू व्हायला हवेत असे धोरण ठरवून काम केले जाणार आहे. त्यासाठी सर्वेक्षण केले जात असून जोखमी आजार असणाऱ्यांची माहिती काढण्यात येत आहे. जोखमीचे आजार असणाऱ्या व्यक्तींची महिती गोळा करण्यात आली आहे. लवकर उपचार झाले तर मृत्युदर नियंत्रणात ठेवता येईल या उद्देशाने काम केले जात असल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. जिल्ह्यात ऑक्सिजन आणि औषधे कमी पडणार नाहीत याची काळजी घेत असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

* औरंगाबाद जिल्ह्य़ात परजल्ह्य़ातून उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्याही खूप आहे. आतापर्यंत शहरातील विविध रुग्णालयात परजिल्ह्य़ातील १७८ जणांचा मृत्यू झाला आहे.

* मृत्यूपूर्वी रुग्णालयात किती दिवस उपचार झाले याचेही विश्लेषण केले जात आहे. त्याचा तपशील

*  ० ते एक दिवस रुग्णालयात असणारे रुग्ण – १९७

* दोन दिवस – ८१

* तीन दिवस – ७४

एकूण मृत्यू

एप्रिल-०७

मे-६७

जून-२०७

जुलै-२१७

ऑगस्ट-२१२

सप्टेंबर-१८३

एकूण-८९५

‘‘टाळेबंदीनंतर मुखपट्टी न बांधणाऱ्यावर कारवाई केली जात आहे. सर्वेक्षणासाठी कर्मचारी पुन्हा कामाला लागले आहेत. त्यामुळे विषाणूला अटकाव करण्यासाठी डॉक्टरांना अधिक संधी मिळू शकेल. खासगी डॉक्टरांच्या सेवाही अधिग्रहित करण्यात आल्या असून काही डॉक्टर रुजू होण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. त्यांच्याशी आधी चर्चा केली जाईल. अशा संकटकाळात डॉक्टरांनी मानवतेच्या दृष्टीने अधिक काम करावे असे आवाहन करत आहे. बुधवारी या अनुषंगाने काही जणांशी बोलणी झाली. याउपरही रुजू होण्यास कोणी तयार नसेल तर कारवाई करणे भाग पडेल. पण तशी वेळ येऊ नये असेच प्रशासनाचे प्रयत्न आहेत. शासनाकडून जेवढे मानधन देणे शक्य आहे ती रक्कम देत आहोत त्याचा विचार डॉक्टरांनीही करावा.

– सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी औरंगाबाद

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 24, 2020 12:12 am

Web Title: infection prevention campaign in aurangabad district abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 मद्यविक्रीत वाढ, तरीही महसूल कमी
2 पॅरोलवाढीसाठी कैद्यांना अर्ज करण्यास सांगू नये
3 डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ विभाजनाचा विचार नाही – उदय सामंत
Just Now!
X